नवी दिल्ली : पुढील वर्षी होणा-या ‘आयपीएल’च्या ११व्या सत्रामध्ये क्रिकेटप्रेमींसाठी अनेक मुख्य बदल झालेले पहायला मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नव्या मोसमात लीगमधील सर्वच खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार असून कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळेल याचे अंदाज आत्तापासून बांधले जात आहेत. त्याचवेळी, मध्यरात्रीपर्यंत रंगणाºया सामन्यांमुळे होत असलेल्या उशीरामुळे सामन्यांच्या वेळेतही बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयपीएलच्या आगामी सत्राबाबत आत्तापासूनच क्रिकेटप्रेमींमध्ये अनेक अंदाज बांधले जात आहेत. कोणता खेळाडू महागडा ठरेल, कोणत्या संघाची बांधणी मजबूत होईल, अशा अनेक चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगत आहेत. त्याचवेळी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल संचालन परिषद यांनी सामन्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार असल्याचेही संकेत दिले आहे. यानुसार जर ब्रॉडकास्ट कंपनीने बीसीसीआयचे म्हणणे मान्य केले, तर रात्री ८ वाजता सुरु होणारे सामने एक तास आधी ७ वाजल्यापासून सुरु होतील. रात्री ८ वाजता सुरु होणारा सामना संपेपर्यंत रात्रीचे १२ वाजतात, यामुळे प्रेक्षकांसह आलेल्या शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा त्रास व्हायचा. या वेळेच्या बदलाची मागणी याआधीही झाली होती. परंतु, आता ‘आयपीएल’ समितीने ही मागणी मान्य केली आहे.
त्याचवेळी, सामना ७ वाजता सुरु करण्याचे निश्चित झाल्यास, संध्याकाळी ४ वाजता होणारा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. ‘आयपीएल’ परिषदेच्या बैठकीत आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी वेळेच्या बदलाचा प्रस्ताव सादर केला व सर्व फ्रेंचाईजींनी हा प्रस्ताव मान्यही केला आहे. मात्र, अंतिम निर्णय ब्रॉडकास्ट कंपनीवर अवलंबून असून त्यांनी मान्य केल्यानंतरच सामन्यातील वेळेचा बदल शक्य होईल.
दुसरीकडे, सर्व फ्रेंचाईजीने आणखी एक प्रस्ताव मान्य केला असून यानुसार आयपीएल सुरु असतानाही खेळाडूंची अदलाबदल होऊ शकते. यामुळे आता इंग्लिश प्रीमियर लीगच्या धर्तीवर लीगदरम्यानही खेळाडूंची जर्सी बदलू शकते. लीगदरम्यान सातपैकी किमान दोन सामने खेळलेल्या खेळाडूंचा यात समावेश असेल.
५ डिसेंबरला आयपीएल संचालन परिषदेची बैठक होईल. यामध्ये इतर विषयांवरही चर्चा होईल. लीगदरम्यान खेळाडूंच्या अदलाबदलीच्या प्रस्तावावर सर्व फ्रेंचाईजींनी पसंती दर्शवली. यामुळे अंतिम अकरामध्ये स्थान न मिळालेल्या गुणवान क्रिकेटपटूंना अधिक फायदा होईल.
- राजीव शुक्ला, आयपीएल आयुक्त