Join us  

मुंबईसह सहा ठिकाणी IPL रंगणार; बीसीसीआयला महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने सुरुवातीला मुंबई व अहमदाबादला पसंती दिल्याचे वृत्त होते. साखळी सामने मुंबईतील चार स्टेडियम्समध्ये, तर प्ले ऑफसह अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळविण्याची योजना होती. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 4:41 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्यावर्षी सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे १३ वे सत्र यूएईमध्ये आयोजित झाल्यानंतर यंदाची आयपीएल स्पर्धा भारतामध्येच आयोजित करण्याची योजना बीसीसीआयने आखली आहे. यासाठी एकूण ६ स्थळांचा विचार होत असल्याची चर्चा आहे . त्याचवेळी, मुंबईतील सामने प्रेक्षकांविना होणार असून महाराष्ट्र राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरच सामने मुंबईत आयोजित होतील, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली.

कोरोनाचा प्रभाव पाहता बीसीसीआयने सुरुवातीला मुंबई व अहमदाबादला पसंती दिल्याचे वृत्त होते. साखळी सामने मुंबईतील चार स्टेडियम्समध्ये, तर प्ले ऑफसह अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळविण्याची योजना होती. आता यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईही सध्या याच मार्गावर असल्याने बीसीसीआयने ‘प्लॅन बी’ आखला आहे.

यानुसार आता बीसीसीआयने मुंबईसह दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु व कोलकाता या स्थळांचा विचार केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहता सामन्यांसाठी परवानगी मिळाली, तरी सर्व सामने प्रेक्षकांविना होतील, अशी माहिती मिळाली. अशा परिस्थितीत केवळ मुंबईतील सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती नसेल, तसेच इतर ठिकाणी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने होतील.महाराष्ट्र सरकारने काही ठिकाणी निर्बंध घालण्यास सुरुवात केली असल्याने मुंबईत बीसीसीआयने निश्चित केलेल्या वानखेडे, ब्रेबॉर्न, रिलायन्स आणि डॉ. डी.वाय पाटील या चार स्टेडियम्सवर प्रेक्षकांना प्रवेश बंदी असेल. अद्याप आयपीएल फ्रेंचाईजींना स्पर्धेच्या अंतिम स्थळांबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे, बीसीसीआयने आता इतर स्थळांचा विचार केलेला असला, तरी मुंबईसाठी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

मार्चमध्ये जाहीर होणार वेळापत्रक?आयपीएल संचालन परिषदेची बैठक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होईल. यामध्ये यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे. यंदाची आयपीएल ११ एप्रिल ते ६ जूनदरम्यान होऊ शकते. आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्यांनाही किमान महिनाभर आधी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्याची विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.

‘एमसीए’मध्ये चर्चा नाहीn मुंबईतील स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांना प्रवेश बंदी असेल, याबाबत मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये (एमसीए) अद्याप चर्चा झाली नसल्याची माहिती एमसीएच्या सदस्याने दिली. n त्यांनी सांगितले की, ‘अद्याप एमसीए सदस्यांमध्ये यावर चर्चा झालेली नाही. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारचे पत्रक आमच्यापर्यंत आलेले नाही.’ 

टॅग्स :आयपीएल