Join us  

वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला

२ जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 5:34 PM

Open in App

Bangladesh vs America Cricket : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्याकडे आहे. २ जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा तोंडावर असताना यजमान अमेरिकेने बांगलादेशचा पराभव करून 'तैय्यार है हम' हे दाखवून दिले. बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून अमेरिकेने विजयी सलामी दिली. क्रिकेट विश्वाला धक्का देताना अमेरिकेने बांगलादेशचा ५ गडी राखून धुव्वा उडवला. 

अमेरिकेकडून हरमीत सिंगने निर्णायक खेळी करताना १३ चेंडूत ३३ धावांची कुटल्या. भारतीय वंशाच्या या शिलेदाराने आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. खरे तर त्याने अंडर-१९ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा तो हिस्सा राहिला आहे. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१२ मध्ये अंडर-१९ विश्वचषक उंचावला होता. हरमीत या विश्वविजेत्या संघाचा भाग होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला म्हणावी तशी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशने निर्धारित २० षटकांत १५३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेने सहज लक्ष्य गाठले. १९.३ षटकांत आव्हान गाठून विजयी सलामी देण्यात अमेरिकेला यश आले. 

दरम्यान, २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. एकूण २० संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात असतील. २० संघांचे चार गटात विभाजन करण्यात आले आहे. 

विश्वचषकासाठी चार गट - 

अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

टॅग्स :बांगलादेशअमेरिकाट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024