गयाना : तमीम इकबाल आणि शाकिब अल हसन यांनी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने कसोटी मालिकेतील पराभव विसरताना पहिल्या वन डे सामन्यात आज वेस्ट इंडीजचा ४८ धावांनी पराभव केला.
सामनावीर तमीम इकबालने नाबाद १३० धावा केल्या. जी वेस्ट इंडीजविरुद्ध वन डेतील बांगलादेशी फलंदाजाकडून केलेली सर्वोत्तम धावांची खेळी आहे. शाकिबने ९७ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी २०७ धावांची भागीदारी केली.
या दोघांच्या भागीदारीच्या बळावर बांगलादेशने ४ बाद २७९ धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने ११ चेंडूंत ३० धावा केल्या. अखेरच्या २ षटकात बांगलादेशने ४३ धावा वसूल केल्या. तमीमने १६० चेंडूंत १० चौकार व ३ षटकार मारले.
त्यानंतर मशरेफ मुर्तुझाने ३७ धावांत घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडीजला ९ बाद २३१ धावांत रोखताना रोमहर्षक विजय मिळविला.
ख्रिस गेल आणि शिमरोन हेटमेयर खेळपट्टीवर असताना वेस्ट इंडीजच्या संघाने विजयाकडे कूच केली होती. गेल ४० धावांवर बाद झाला तर हेटमेयर ५२ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर वेस्ट इंडीजचे फलंदाज बाद होत गेले. देवेंद्र बिशू आणि अलजारी जोसेफ यांनी अखेरच्या गड्यासाठी ५९ धावांची झुंजार भागीदारी केली; परंतु ते पराभव टाळू शकले नाहीत.