Join us
Daily Top 2Weekly Top 5

अझरुद्दीनचा मुलगा गोव्याकडून खेळणार; सोशल मीडियावर जोरदार टीका

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा मुलगा असादुद्दीन याला रणजी संभाव्य संघात व्यावसायिक खेळाडू घेतल्याने गोवा क्रिकेट संघटनेवर आजी-माजी खेळाडूंनी टीका केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:33 IST

Open in App

- सचिन कोरडे  भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा मुलगा असादुद्दीन याला रणजी संभाव्य संघात व्यावसायिक खेळाडू घेतल्याने गोवा क्रिकेट संघटनेवर आजी-माजी खेळाडूंनी टीका केली आहे. ‘जीसीए’ असादुद्दीनला एक पाहुणा खेळाडू म्हणून घेतल्याचे सांगत असली तरी असादुद्दीने एकही प्रथम श्रेणी क्रिकेट सामना न खेळल्याने त्याला संधी मिळाली कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सोशल मीडियातूनही जीसीएवर टीका केली जात आहे.

गोव्याचा माजी रणजी कर्णधार तसेच आयपीएल स्टार शदब जकाती याला रणजी संभाव्य संघातून वगळण्यात आले. याचे त्याला स्वत:लाच आश्चर्य वाटत आहे. गेल्या सत्रात कामगिरी चांगली झाली असतानाही आपणास डच्चू का देण्यात आला? असा सवाल त्याने उपस्थित केला. २० वर्षांपासून मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. मी २७५ बळी घेतले आहे. कामगिरीचा विचार न खेळता व्यावसायिक खेळाडूंचे नाव पुढे करत राज्याबाहेरील नवख्या खेळाडूंचा जीसीए विचार करीत आहे. ही केवळ स्वार्थी वृत्ती आहे. अध्यक्ष सूरज लोटलीकरांच्या मक्तेदारीचा हा परिणाम असल्याचेही त्याने म्हटले. असादुद्दीन मोहम्मद आणि अमीत वर्मा हे दोन्ही व्यावसायिक नाहीत. या दोघांमुळे दोन गोमंतकीय खेळाडूंचे नुकसान होत आहे. जीसीएकडून आपल्यावर अन्याय झाला असून याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करु, असेही शदाबने स्पष्ट केले. माजी रणजीपटू नामदेव फडते यांनी जीसीएच्या कारभारावर टीका केली. बाहेरचे खेळाडू आणून जीसीए राज्यातील खेळाडूंवर अन्याय करीत आहे. असादुद्दीनने एकही सामना खेळलेला नाही. त्याला त्यांच्या राज्यात संधी मिळत नाही. त्यामुळे त्याला गोव्याकडून खेळविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू हेमंत आंगले यांनी सुद्धा जीसीएच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, जो रणजी खेळला आहे. कसोटी खेळलेला आहे. ५०-६० सामन्यांचा अनुभव आहे. अशा खेळाडूला व्यावसायिक खेळाडू म्हणून संघात घेण्यास काहीच हरकत नाही. अशा खेळाडूंमुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळते तसेच राज्याच्या कामगिरीत भर पडते. परंतु, ज्याने कधी प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. त्याला तुम्ही पाहुणा किंवा व्यावसायिक खेळाडू म्हणून संघात घेता, हे योग्य नाही. शदाब जकाती हा गोव्याचा अनुभवी खेळाडू आहे. एक कर्णधार, ऑलराउंडर आणि आयपीएल स्टार असलेल्या शदाबला का वगळले? याचे आश्चर्य वाटते. शदाबने २७५ बळी घेतले आहेत. तो ३०० बळींच्या जवळपास आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोमंतकीय गोलंदाज आहे. त्याला दोन-तीन वर्षे संधी द्यायला हवी. जीसीएचा निर्णय धक्कादायक तसेय संशयास्पद आहे. 

सोशल मीडियावर जीसीए...फेसबुक, ट्विटर आणि इन्स्ट्राग्रामवर जीसीएच्या निर्णयावर जबरदस्त टीका होत आहे. अझरुद्दीनच्या मुलाला संभाव्य संघात घेतल्याने गोमंतकीय क्रिकेटची व्यवस्थापनाने वाट लावली, अशी प्रतिक्रीया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. जीसीएकडे खेळाडू नसतील तर काही पत्रकारही चांगले खेळतात त्यांना पॅड बांधू द्या, अशी सणसणीत टीका एका पत्रकाराने केली.

टॅग्स :क्रिकेटक्रीडा