Join us  

आॅस्ट्रेलियाची गोलंदाजी कमकुवत, भारत ४-१ ने विजय मिळवेल -  लक्ष्मण 

आॅस्ट्रेलियाविरुद्ध आगामी पाच वन-डे सामन्यांची मालिका चुरशीची होईल; पण पाहुण्या संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ४-१ ने सरशी साधण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने दिली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 2:08 AM

Open in App

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध आगामी पाच वन-डे सामन्यांची मालिका चुरशीची होईल; पण पाहुण्या संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ४-१ ने सरशी साधण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने दिली आहे. अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा गोलंदाजांना स्वत:ची छाप पाडण्याची चांगली संधी आहे, असेही लक्ष्मण म्हणाला.चेन्नईमध्ये एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणाºया मालिकेपूर्वी लक्ष्मणने आज चर्चा करताना सांगितले की, ‘भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान नेहमीच चुरशीचे क्रिकेट बघायला मिळते. यापूर्वी आॅस्ट्रेलिया संघ येथे आला त्या वेळी न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश या संघांनंतर त्यांच्यासोबत कसोटी मालिका झाली होती. त्या मालिकेत चुरस अनुभवाला मिळाली होती.’लक्ष्मण पुढे म्हणाला, ‘या वेळी मर्यादित षटकांच्या मालिकेने मायदेशातील आंतरराष्ट्रीय मोसमाची सुरुवात होत आहे. ही मालिका चुरशीची होईल. माझ्या मते, आॅस्ट्रेलियाची गोलंदाजीची बाजू कमकुवत आहे. त्यामुळे भारत या मालिकेत ४-१ ने बाजी मारू शकतो.’आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क लक्ष्मणच्या मताशी सहमत आहे. आॅस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण कमकुवत असल्याचे मान्य करणाºया क्लार्कने मात्र पाहुणा संघ या मालिकेत ३-२ ने विजय मिळवेल, असे भाकीत वर्तविले आहे.क्लार्क म्हणाला, ‘आम्हाला वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड (दुखापतीतून सावरत आहे) यांची उणीव भासते. यांचा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये समावेश आहे. पण, आॅस्ट्रेलिया संघात सामना जिंकून देण्याची क्षमता असलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडू वैयक्तिक व संघासाठी चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलिया या मालिकेत ३-२ ने विजय मिळवेल.’आगामी मालिकेत अश्विन व जडेजा यांना संधी न दिल्याबाबत बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘या दोन्ही खेळाडूंना वगळण्यात आलेले नाही. या दोघांना विश्रांती देण्यात आलेली आहे. निवड समितीने २०१९च्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघात काही प्रयोग केलेले आहेत. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान फिरकीपटूंना मदत मिळत नव्हती. त्यामुळे श्रीलंकेत मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाºया कुलदीप यादव (चायनामन) व यजुवेंद्र चहल (लेग स्पिनर) यांना संधी दिली. त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. श्रीलंका संघ कमकुवत होता. त्यामुळे त्यांना आता आॅस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाविरुद्ध संधी दिलेली आहे. विश्वकप २०१९ साठी निवड समिती मनगटाच्या जोरावर चेंडू वळविणारा फिरकी गोलंदाज व फिनिशरची भूमिका बजावणारा खेळाडू याचा शोध घेत आहे. फिनिशर म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्यासारख्या खेळाडूंवरील दडपण कमी होईल. २०१९ पर्यंत खेळाडूंना संघात त्यांना कुठली भूमिका बजवायची आहे, याची कल्पना आलेली असेल.’अजिंक्य रहाणेला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मर्यादित संधी मिळाली आहे, याबाबत बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘रहाणे शानदार खेळाडू असून, या गटात तो नेतृत्व करणारा क्रिकेटपटू आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्या वेळी त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. विंडीज दौºयात त्याने चांगली कामगिरी केली, पण संघात तो सलामीवीर म्हणून खेळतो. रोहित शर्मा व शिखर धवन सध्या शानदार फॉर्मात असल्यामुळे त्याला संधी मिळालेली नाही. संघात स्थान मिळविण्याची स्पर्धा असली, तरी त्याला वेळ आली म्हणजे संधी मिळेल.’युवराज सिंगची कारकीर्द संपली आहे असे मानायचे का, याबाबत बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘युवराजला विश्रांती देण्यात आलेली आहे. त्याच्या अनुपस्थितीत केदार जाधव, मनीष पांडे आणि लोकेश राहुल यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. युवराज चांगला खेळाडू असून, मॅच विनर म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. पांड्याने जर गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आणि कामगिरीमध्ये सातत्य राखले तर तो आगामी मालिकेमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरू शकतो. अनेक खेळाडू मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरच्या शर्यतीत आहेत. शिखर धवन व रोहित शर्मा यांनी पुनरागमनानंतर शानदार कामगिरी करताना शतके झळकावली आहेत. पण पांड्याने गोलंदाजीमध्ये सातत्य राखले तर तो मालिकेत सर्वोत्तम खेळाडू ठरू शकतो.’ (वृत्तसंस्था) आॅस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज शानदार आहेत. ते कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध वर्चस्व गाजवू शकतात. त्यांच्या संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅरोन फिंच, जेम्स फॉकनर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे खेळाडू आहेत. त्यांना भारतात क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. आयपीएलमुळे त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. - व्ही. व्ही. एस. लक्ष्मणभारताचे आघाडीचे तीन फलंदाज शानदार आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्यांचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियाला विजय मिळविण्यासाठी पहिल्या १० षटकांत भारताच्या तीन फलंदाजांना माघारी परतवावे लागेल. आॅस्ट्रेलियन खेळाडूंसाठी भारत हे दुसरे घर आहे. आगामी मालिकेत ते जर यशस्वी ठरले तर इंग्लंडविरुद्ध (अ‍ॅशेस मालिका) खेळताना त्यांचे मनोधैर्य उंचावलेले राहील. - मायकल क्लार्क

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ