AUS vs IND, Sam Konstas Wicket Watch Jasprit Bumrah Sensational Delivery :भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा युवा बॅटर सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) यांच्यात पहिल्या डावात कमालीचा सामना पाहायला मिळाला. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात युवा बॅटरनं बुमराहला आकर्षक फटके मारत लढाई जिंकली. पण दुसऱ्या डावात बुमराहनं बाजी मारली. नाद करा... पण आमचा कुठं? या तोऱ्यात जसप्रीत बुमराहनं युवा बॅटरची मधली स्टंप उडवत त्याचा खेळ खल्लास केला. जसप्रीत बुमराह हा विकेट मिळवल्यावर खूप उत्साहित दिसत नाही. पण या विकेटनंतर बुमराहचं सेलिब्रेशन बघण्याजोगे होते. याआधी ट्रॅविस हेडची विकेट घेतल्यावर त्याने अशाच अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते.
बुमराह फक्त बोलला नाही त्यानं सॅमला आउट करून दाखवलं
ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय युवा बॅटरनं पहिल्या डावात बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाजात बॅटिंग केली होती. ६५ चेंडूतील ६० धावांच्या खेळीत त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर १२ चेंडूत जवळपास ३२ धावा काढल्या होत्या. त्याच्या या खेळीवर जसप्रीत बुमराहनं प्रतिक्रियाही दिली होती. यावेळी जस्सीनं युवा बॅटरचं कौतुक केलं. पण ६-७ वेळा सहज आउट करतो, असे बोलून दाखवले होते. जो बोलला ते बुमराहनं दुसऱ्या डावात करून दाखवलं.
चौथ्या दिवसातील खेळाच्या काही षटकातच भारतीय ंसघाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं १०५ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा या जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या डावात ८९ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. यावेळी मात्र बुमराहनं सलामी जोडीचा डाव हाणून पाडला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील सातव्या षटकात जसप्रीत बुमराहनं परफेक्ट टप्प्यावर चेंडू टाकून युवा बॅटरला क्लीन बोल्ड करत पहिल्या डावातील हिशोब चुकता केला.
बुमराहनं विकेट मिळवल्यावर खास अंदाजात केलं सेलिब्रेशन
युवा बॅटरला बीट करून मिडल स्टंप उडवल्यावर जसप्रीत बुमराहनं खास अंदाजात या विकेटचं सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा सॅम दुसऱ्या डावात दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. तो १८ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ८ धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीच्या विकेटनंतर सॅमनं सीमारेषेवर ज्या अंदाजात प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी हातवारे करून सेलिब्रेशन साजरे केले त्याच अंदाजात बुमराहनं युवा बॅटरच्या विकेटचा आनंद साजरा केला.
Web Title: Australia vs India 4th Test Day 4 Jasprit Bumrah Take Wicket Youngster Sam Konstas With Sensational Delivery During IND vs AUS Boxing Day Test Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.