ब्रिस्बेन : भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान बुधवारपासून टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होत आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताचे पारडे वरचढ राहील. या सामन्यात भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक धावा काढण्याचा विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे.
भारताने नोव्हेंबर २०१७ पासून सात टी२० मालिका जिंकल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने २,२०७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलचा (२,२७१) सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकण्यासाठी रोहितला ६५ धावांची गरज असून त्याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे,आॅस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीदरम्यान घडलेल्या चेंडू छेडखानी वादातून सावरू शकलेला नाही. वॉर्नर व स्मिथ यांच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियन संघ कमकुवत आहे. दोघांवरील कारवाईनंतर आॅस्ट्रेलियाला एकही टी२० मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे एकवेळ मायदेशात अपराजित राहिलेला आॅस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा तो प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतो का, याबाबत उत्सुकता आहे.
भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघ जगातील सर्वोत्तम फलंदाजाला कसे रोखते, हे बघावे लागेल. कोहलीने २०१६ च्या मालिकेत तीन डावांमध्ये १९९ धावा केल्या होत्या. त्याने इंग्लंडमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळविले होते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचा समतोल साधणे चिंतेचा विषय आहे.
गाबाच्या उसळी घेणाºया खेळपट्टीवर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व खलिल अहमद उपयुक्त ठरू शकतात. फिरकीची बाजू कुलदीप यादव, युझवेंद्र चहल सांभाळतील. आॅस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅक्सवेल व अॅडम झम्पा फिरकी बाजू सांभळतील, पण परिस्थिती लक्षात घेत यजमान वेगवान गोलंदाजीच्या जोरावर भारतावर दडपण आणू शकतात. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद.
आॅस्ट्रेलिया : अॅरोन फिंच (कर्णधार), एस्टोन एकर, जेसन बेहरेनडोर्फ, एलेक्स कारे, नॅथन कुल्टर नाईल, ख्रिस लिन, बेन मॅकडरमॉट, ग्लेन मॅक्सवेल, डीआर्सी शॉर्ट, बिली स्टानलेक, मार्कस स्टोइनिस, अॅण्ड्य्रू टाय आणि अॅडम झम्पा.
सामना : भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता