जोहान्सबर्ग : केपटाऊन कसोटी सामन्यात चेंडूशी केलेल्या छेडछाड प्रकरणी आॅस्ट्रेलियाई खेळाडूंना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) केलेल्या कारवाईनुसार सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरुन कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्रॉफ्ट यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी गंभीर चौकशी करण्यासाठी ‘सीए’ने दक्षिण आफ्रिकामध्ये मंगळवारी तत्काळ एक बैठक घेतली आणि यानंतर ‘सीए’ने पत्रकार परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली.
‘सीए’ने केलेल्या कारवाईची माहिती देण्याआधी सीइओ जेम्स सदरलँड यांनी सर्वप्रथम या प्रकरणाबाबत जाहीर माफी मागितली. सदरलँड यांनी माहिती दिली की, ‘क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि आयसीसी यांच्या वतीने चौकशी करण्यात आली आहे. अद्यापही चौकशी पूर्ण झालेली नसली, तरी सुरुवातीपासून झालेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे की, हा कट पूर्णपणे कर्णधार स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांनी रचला होता. इतर कोणाला याबाबत कल्पना नव्हती.’
त्याचवेळी, आॅस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदी डॅरेन लेहमन कायम राहतील असेही सदरलँड यांनी स्पष्ट केले. सदरलँड म्हणाले की, ‘करार समाप्त होईपर्यंत लेहमन संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. या कटामध्ये लेहमन यांचा कोणताही सहभाग नव्हता. टीम पेन याच्याकडे संघाची धुरा सोपविण्यात आली असून स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांना मलिकेतून निलंबित करुन मायदेशी पाठविण्यात येत आहे. तिघांच्याही शिक्षेबाबत पुढील २४ तासांमध्ये निर्णय घेण्यात येईल.’
मॅथ्यू रेनशॉ, जो बर्न्स, ग्लेन मॅक्सवेल यांची निवड
क्वीन्सलँडचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू रेनशॉ लवकरच आॅस्ट्रेलिया संघात पुनरागमन करेल. कारण या फलंदाजाला ब्रिस्बेनमध्ये शेफील्ड शील्डच्या अंतिम लढतीनंतर लगेच दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यास सांगितले आहे. तेथे त्याला डेव्हिड वॉर्नरच्या स्थानी अंतिम संघात स्थान मिळू शकते. रेनशॉ मंगळवारी सायंकाळी जोहान्सबर्गसाठी रवाना होणार आहे. केपटाऊनमध्ये चेंडूसोबत छेडखानी प्रकरणामुळे निर्माण झालेले संकट बघता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाºया चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी तो संघासोबत जुळण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर जो बर्न्स व ग्लेन मॅक्सवेल यांचीही संघात वर्णी लागली आहे. क्रिकेट आॅस्टेÑलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांना मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागी या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली. रेनशॉ चांगल्या फॉर्मात असून बुल्सतर्फे त्याने अंतिम लढतीपूर्वी तीन शतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे त्याच्या जागी बेनक्रॉफ्टची निवड करण्यात आली होती.
विजय नक्कीच मिळवला पाहिजे, परंतु अखिलाडूवृत्तीच्या जोरावर विजय मिळवला नाही पाहिजे. या घटनेनंतर आॅस्टेÑलियन नागरिकांच्या मनातही राग असून तितकेच ते निराशही झाले आहेत. याप्रकरणी दोषी असलेल्यांना शिक्षा नक्की मिळणार, मात्र यासाठी चौकशीची प्रक्रीया योग्यरीतीने पूर्ण करणेही जरुरी आहे.
- जेम्स सदरलँड, सीइओ - सीए.
स्लेजिंग संपविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
सिडनी : आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकम टर्नबुल यांनी चेंडूच्या छेडखानी प्रकरणानंतर क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी या खेळातून स्लेजिंग संपविण्याचे आवाहन केले आहे. टर्नबुल यांनी छेडखानी प्रकरण आॅस्ट्रेलियासाठी मानहानिजनक असल्याचे म्हटले आहे. आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यादरम्यान चेंडूसोबत छेडखानी करण्याची योजना आखली होती, अशी कबुली दिली आहे. टर्नबुल म्हणाले, जर क्रिकेटला पुन्हा एकदा आदर्श खेळ म्हणून प्रतिमा निर्माण करायची असेल तर क्रिकेट संघटनांनी स्लेजिंगवर अंकुश लावायला हवा. स्लेजिंग करणाºया खेळाडूंवर कठोर कारवाई व्हायला हवी. यावर आता नियंत्रण नसते. स्लेजिंगला क्रिकेटमध्ये कुठेही स्थान नसायला हवे. क्रिकेट पुन्हा एकदा आदर्श खेळ म्हणून जगापुढे असावा.’
अॅशेस मालिकेतही चेंडूसोबत छेडछाड केली : वॉन
लंडन : आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध अलीकडेच खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यानही चेंडूशी छेडछाड करण्याची रणनीती वापरली असावी, असे माझे ठाम मत असल्याचे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने म्हटले आहे. स्मिथने म्हटले होते की, माझ्या नेतृत्वाखाली असे प्रथमच घडले आहे.’ पण २००५ च्या अॅशेस विजयादरम्यान इंग्लंडचा कर्णधार राहिलेल्या वॉनच्या मते असे बºयाच दिवसांपासून घडत आहे. वॉन म्हणाला, ‘हे प्रथमच घडले असावे, यावर माझा विश्वास नाही. विशेषत: अॅशेस मालिकेत बºयाच क्षेत्ररक्षकांनी बºयाच पट्ट्या बांधलेल्या असल्याचे मी पाहिले आहे. ते मिड आॅफ, मिड आॅनवर तैनात असायचे.’
टीका करताना समतोल दृष्टिकोन राखणे आवश्यक - स्टीव्ह वॉ
सिडनी : आॅस्ट्रेलियन क्रिकेटला हादरविणा-या चेंडू छेडखानी प्रकरणात ‘केंद्रित व संतुलित दृष्टिकोन’ राखायला हवा, असे आवाहन माजी कर्णधार स्टीव्ह वॉने केले आहे. वॉने आॅस्ट्रेलियन संघाची दगाबाजी करण्याची योजना म्हणजे ‘निर्णय घेण्यात झालेली चूक’ असल्याचे म्हटले आहे. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीबाबत असलेल्या नियमांचे पुन्हा एकदा पठण करावे, असा सल्लाही त्याने यावेळी दिला.
वॉ म्हणाला,‘या प्रकरणात ज्यांचा समावेश आहे त्यांच्यावर टीका करताना केंद्रित व समतोल दृष्टिकोन राखण्याची गरज आहे. आपण सर्वांनी खेळाडूंवर होणा-या सामाजिक व मानसिक प्रभावाचा गांभीर्याने विचार करायला हवा.’
विजयाच्या उत्सुकतेपोटी आॅस्ट्रेलियाने चूक केली : गिब्सन
केपटाऊन : कुठल्याही स्थितीत विजय मिळवण्याच्या मनिषेपोटी आॅस्ट्रेलियाने न्यूलँड््समध्ये तिस-या कसोटी सामन्यात चेंडूसोबत छेडखानी केली, असे मत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी व्यक्त केले. गिब्सन म्हणाले, ‘कुठल्याही स्थितीत विजय मिळवण्यास उत्सुक असल्याचे आॅस्ट्रेलियन खेळाडू स्वत:च सांगतात. अॅशेस मालिकेचा विचार करता त्यांनी सहज विजय मिळवला. येथे मात्र काहीवेळा ते पिछाडीवर पडले. त्यामुळे ते पुनरागमन करण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी चेंडूसोबत छेडखानी करण्याचा आधार घेतला, हे लाजिरवाणे कृत्य आहे.’