१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट; पाकला नमवून भारत उपांत्य फेरीत

सलामीवीर अर्जुन आझादचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:37 AM2019-09-08T02:37:34+5:302019-09-08T02:37:50+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup Under-19 Cricket | १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट; पाकला नमवून भारत उपांत्य फेरीत

१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट; पाकला नमवून भारत उपांत्य फेरीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोरातुवा (श्रीलंका) : अर्जुन आझाद (१२१) आणि एन. टी. तिलक वर्मा (११०) यांच्या शतकी तडाख्यानंतर मुंबईकर अथर्व अंकोलेकर (३/३६) याने घेतलेल्या फिरकीच्या जोरावर भारतीय युवा क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६० धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आक्रमक शतक करणारा अर्जुन सामनावीर ठरला.

तायरॉन फर्नांडो स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार ध्रुव जुरेल याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्जुन आणि वर्मा यांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविताना भारताला ५० षटकात ९ बाद ३०५ धावांची आव्हानात्मक मजल मारुन दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव ४६.४ षटकात केवळ २४५ धावांत संपुष्टात आला. लेग स्पिनर अथर्वने अचूक टप्प्यावर मारा करताना १० षटकांत केवळ ३६ धावांच्या मोबदल्यात ३ खंदे फलंदाज बाद केले. याशिवाय विद्याधर पाटील (२/२८) आणि सुशांत मिश्रा (२/३७) यांनीही टिच्चून मारा करत अथर्वला चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून कर्णधार रोहैल नाझिर याने १०८ चेंडूत १२ चौकार व ३ षटकारांसह ११७ धावांची एकाकी झुंज दिली. मधल्या फळीतील हॅरिस खान यानेही ५३ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ४३ धावा
केल्या.

तत्पूर्वी, सलामीवीर सुवेद पारकर (३) झटपट बाद झाल्यानंतर अर्जुन-वर्मा यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेत १८३ धावांची जबरदस्त भागीदारी केली. अर्जुनने १११ चेंडूत ११ चौकार व ४ षटकारांसह १२१ धावांचा तडाखा दिला. वर्माने ११९ चेंडूत १० चौकार व एका षटकारासह ११० धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने भारताला धक्केबसले खरे, मात्र अर्जुन-वर्मा यांच्या तुफानी भागीदारीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक मजल मारण्यात यश मिळवले. पाकिस्तानकडून नसीम शाह (३/५२) आणि अब्बास आफ्रिदी (३/७२) यांनी चांगला मारा केला.

Web Title: Asia Cup Under-19 Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.