Join us

आशिया कप क्रिकेट : भारतीय महिला संघ विजयी

भारताने महिला टी-२० आशिया कपमध्ये सलामी लढतीत आज मलेशियाचा केवळ २७ धावांत खुर्दा उडवित १४२ धावांनी शानदार विजय नोंदविला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:45 IST

Open in App

क्वालालम्पूर : भारताने महिला टी-२० आशिया कपमध्ये सलामी लढतीत आज मलेशियाचा केवळ २७ धावांत खुर्दा उडवित १४२ धावांनी शानदार विजय नोंदविला.मलेशियाच्या सहा महिला फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १६९ धावांची मजल मारली. सीनिअर फलंदाज मिताली राजने ६९ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ९७ धावा फटकावल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघ केवळ १३.४ षटकांत गारद झाला. पूजा वस्त्रकारने केवळ ६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर अनुजा पाटील व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यांनी एकही धाव दिली नाही.मलेशियाच्या केवळ पाच फलंदाजांना खाते उघडता आले; पण एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. साशा आजमीने १० चेंडूंमध्ये सर्वाधिक ९ धावा केल्या. पाच षटकांमध्येच मलेशियाचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यांची ५ बाद १२ अशी अवस्था होती. त्यानंतर कर्णधार विनिफ्रेड डी (२१ चेंडू, ५ धावा) आणि जुमिका आजमी (१५ चेंडू, ४ धावा) यांनी काही वेळ पडझड थोपवली. त्याआधी, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. २ बाद ३५ अशी अवस्था होती. कर्णधार हरमनप्रीत कौरने २३ चेंडूंना सामोरे जाताना ३२ धावा केल्या.मितालीने आपल्या नाबाद खेळीत १३ चौकार व १ षटकार लगावला, पण तिला शतक पूर्ण करता आले नाही. मितालीने हरमनप्रीतसोबत ५३ चेंडूंमध्ये ८६ धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्मा १८ धावा काढून नाबाद राहिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :मिताली राजक्रिकेट