Join us  

Asia Cup 2018 : पाकिस्तानने कुलदीप-चहलचा अभ्यास केला, अन् पेपर सिलॅबस बाहेरचा आला

Asia Cup 2018: कोणत्याही परिक्षेला जाताना आपण भरपूर अभ्यास करतो. इतका की समोर कोणताही प्रश्न आला तर तो चटकन सोडवण्याचा आत्मविश्वास आपल्याला असतो. पण, जर पेपरमध्ये वेगळ्याच सिलॅबसचा प्रश्न आला, तर काय होईल, याची जरा कल्पना करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:30 PM

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : कोणत्याही परिक्षेला जाताना आपण भरपूर अभ्यास करतो. इतका की समोर कोणताही प्रश्न आला तर तो चटकन सोडवण्याचा आत्मविश्वास आपल्याला असतो. पण, जर पेपरमध्ये वेगळ्याच सिलॅबसचा प्रश्न आला, तर काय होईल, याची जरा कल्पना करा. कारण, बुधवारी भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानच्या खेळाडूंना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. 

(Asia Cup 2018: युजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं)

केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी यावेळी प्रत्येकी तीन बळी मिळवत पाकिस्तानचा संपूर्ण संघ 162 धावांत तंबूत पाठवला. त्यानंतर रोहित शर्माने 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. शिखर धवनने 46 धावा करत रोहितला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी नाबाद 31 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने आठ विकेट आणि 126 चेंडू राखून पाकिस्तानला नमवले.

(Asia Cup 2018: भारताने नोंदवला पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय, कसा ते वाचा)

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने दिलेल्या कबुलीतून हा प्रसंग समोर आला. तो म्हणाला,''भारताविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही संपूर्ण अभ्यास करून मैदानात उतरलो होतो. आमची सुरुवातच निराशाजनक झाली. पहिल्या पाच षटकांत दोन फलंदाज गमावले. त्यानंतरही ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि त्यामुळे सामन्यात कमबॅक करता आले नाही.'' 

''कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीचा सामना करण्याची तयारी आम्ही केली होती. केदार जाधवचा विचार केलाच नव्हता. ते आम्हाला महागात पडले. सुपर फोर गटापूर्वी झालेल्या चुका सुधारण्याची संधी आमच्याकडे आहे, '' असेही सर्फराजने सांगितले.  केदार जाधवने तीन विकेट टिपल्या आणि भारताकडून सातवा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. 

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान