मुंबई, आशिया चषक 2018: आगामी आशिया चषकक्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या या संघात कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा समावेश नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी नाराजी प्रकट केली. त्यात खलील अहमद हा नवी चेहरा संघात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या सर्वावर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी उत्तर दिले आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन उपकर्णधार असणार आहे. प्रसाद म्हणाले की,'कामाचा भार लक्षात घेता आम्ही
विराट कोहलीली विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तो सातत्याने खेळत आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती मिळण्याची आवश्यकता आहे. विराटच्या खांद्यावरील कामाचा भार लक्षात घेता त्याला आशिया चषक स्पर्धेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.'
29 वर्षीय विराट सध्या कंबरेच्या दुखापतीनेही त्रस्त आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याला कौंटी क्रिकेटमध्येही खेळता आले नव्हते. त्यात लॉर्ड्स कसोटीत दुखापतीने डोकं वर काढल्यामुळे त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागली होती. दुसरीकडे खलील अहमदला संघात स्थान देण्यामागचं कारण प्रसाद यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,' आगामी विश्वचषक स्पर्धेत संघात दोन-तीन जागा भऱण्याची आवश्यकता आहे. त्यात डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाची जागा आहे. त्यामुळे खलीलच्या पर्यायाची आम्ही चाचपणी करत आहोत.'