ठळक मुद्देभारतीय संघाने १९७४ ते २०१८ या कालावधीत १३१ विविध स्टेडियमवर मिळून ९४२ वन डे सामने खेळले.
दुबई, आशिया चषक २०१८: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील भारतीय संघाचा हा पहिलाच सामना आहे. भारतीय वन डे संघासाठी हा १३२ वा स्टेडियम आहे.
भारतीय संघाने १९७४ ते २०१८ या कालावधीत १३१ विविध स्टेडियमवर मिळून ९४२ वन डे सामने खेळले. पण आश्चर्याची बाब म्हणजे दुबईच्या या स्टेडियमवर खेळण्याचा मुहूर्त या आधी कधी आला नाही. आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघ प्रथमच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. भारतीय संघ यापूर्वी संयुक्त अरब अमिराती येथे एकूण ७४ सामने खेळला आहे. त्यातील ७२ माने शारजा स्टेडियमवर, तर दोन सामने अबुधाबी येथे खेळले आहेत.
भारताने सर्वाधिक वन डे सामने शारजा स्टेडियमवर खेळले आहेत. येथे खेळलेल्या ७२ सामन्यांत भारताने ३५ विजय मिळवले आहेत, तर ३७ सामन्यांत त्यांना हार मानावी लागली आहे. संयुक्त अरब अमिराती येथे भारतीय संघ २००६ नंतर पहिली वन डे लढत खेळणार आहे, म्हणजे तब्बल १२ वर्षांनी. भारत सर्वाधिक वन डे सामने खेळणाऱ्या यादीत श्रीलंकेतील कोलंबो ( ४३ ) आणि बांगलादेश मधील मिरपूर ( २२) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर येतो. त्यापाठोपाठ कोलकाता/ मेलबर्न/ हरारे ( प्रत्येकी २१) आणि ढाका/ बंगळूरू ( प्रत्येकी २०) यांचा क्रमांक येतो.