- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
बॉक्सिंग डे कसोटीत भारताने सर्व बाबी चोखपणे पार पाडल्या. पर्थच्या कसोटीत पराभव झाल्यानंतरही संयमी वृत्तीने मुसंडी मारून संघाने दणदणीत असा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली आहे. विराटने नाणेफेकीचा कौल जिंकून विजयी सुरुवात केली; पण फलंदाजीला सुरुवात करताच सामन्यावर अखेरपर्यंत पकड कायम राखली.
सामन्यात गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरली. बुमराहने चेंडूचा वेग आणि चातुर्य या
बळावर अप्रतिम कामगिरी केली. गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या या खेळाडूने २०१८ मध्ये भारतीय क्रिकेटची यशस्वी गाथा लिहिली. बुमराह सामनावीर ठरला तरी ईशांत, शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीला कमी लेखता येणार नाही. एमसीजीवर एकसंघपणे मारा करणाºया भारतीय गोलंदाजांना सलाम...
परदेशात भारतीय फलंदाजी चेतेश्वर पुजारा आणि विराट यांच्यावरच विसंबून असल्याचे जाणवले. या दोघांच्या १७० धावांच्या भागीदारीच्या बळावर पहिल्या डावातील धावडोंगर निर्णायक ठरला. त्याच वेळी पदार्पणात दमदार फटकेबाजी करणारा मयांक अग्रवाल याचेही कौतुक करावे लागेल. अनोळखी खेळपट्टीवर मयांक स्थानिक सामन्यासारखाच विश्वासाने फटके मारताना जाणवला.
हनुमा विहारीने आठ धावा केल्या असतीलही; पण ६६ चेंडूंचा धैर्याने सामना करणे अािण दडपण झुगारून लावणे सोपे नाही. त्याच्यामुळे विराट आणि पुजारावरील ताण कमी झाला.
आॅस्ट्रेलियात पहिल्या
मालिका विजयाकडे कूच करणाºया विराटच्या संघाला आता सिडनीत चौथ्या कसोटीत आणखी विश्वासाने खेळणे सोपे होणार आहे. टीम पेन काय म्हणाला, याकडे फारसे लक्ष न देता माझ्या मते रोहित शर्माचे स्थान कोण घेईल, हे संघासाठी महत्त्वाचे आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला खेळविल्यास वेगवान गोलंदाजांवरील भार कमी होऊ शकेल. याआधी अनेकदा परदेशातही धावा काढण्यात यशस्वी ठरलेला आश्विन संघासाठी दोन्ही आघाड्यांवर उपयुक्त करू शकतो. अंतिम एकादशमध्ये त्याला खेळवावे यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल.
भारताने अखेरचा सामना जिंकून बोर्डर-गावसकर चषक अभिमानाने भारतात आणावा, अशी माझी मनोमन इच्छा आहे.