Join us  

Ashes 2019 : 'या' दोन पदार्थांवर आडवा हात मारून बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला आडव्या बॅटने धुतलं!

Ashes 2019 : इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 11:41 AM

Open in App

लंडन, अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आला होता. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 9 फलंदाज 286 धावांत माघारी परतले होते. विजयासाठी अखेरच्या विकेटला सोबतीला घेऊन बेन स्टोक्सने नाबाद 76 धावांची भागीदारी केली. त्यात जॅक लिचची एक धाव होती, तर स्टोक्सच्या 74 धावा होत्या. स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, जोश हेझलवूड ( 5/30), पॅट कमिन्स ( 3/23) आणि जेम्स पॅटिन्सन ( 2/9) यांनी इंग्लंडचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडसाठी रुट व डेन्ली यांनी इंग्लंडचा डाव सावरला. रुटने 205 चेंडूंत 77, तर डेन्लीने 155 चेंडूंत 50 धावा केल्या. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा गडगडला. त्यानंतर बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी संघर्ष केला, पण हेझलवूडने बेअरस्टोला माघारी पाठवले. मात्र स्टोक्सने अखेरपर्यंत एकट्याने खिंड लढवत धावा 135  केल्याने इंग्लंडला 1 विकेट्सने विजय मिळवता आला. 

या ऐतिहासिक खेळीनंतर स्टोक्सनं दिलेलं उत्तर सर्वांना बुचकळ्यात टाकणारे ठरले. क्रिकेटपटू आपल्या डाएटबद्दल नेहमी सावध असतात. पण, स्टोक्सने चौथ्या दिवसाच्या आदल्या रात्री फ्राईड चिकन आणि चॉकलेटवर ताव मारला होता. त्याने सांगितले की,'' आदल्या रात्री मी फ्राईड चिकन आणि दोनी यॉर्की बिस्किट ( चॉकलेट) आणि काही प्रमाणात मनुका खाल्ल्या होत्या. सकाळी एक-दोन कप कॉफी घेतली होती.''  

टॅग्स :अ‍ॅशेस 2019बेन स्टोक्स