Join us  

Anil Kumble: "झहीर खानने भारतीय संघासाठी जे काय केले ते आता अर्शदीप सिंग करू शकतो"

टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताच्या अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 1:10 PM

Open in App

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताच्या अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि आसिफ अली यांना बाद करून पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्याच्या या गोलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने त्याची तुलना झहीर खानसोबत केली आहे. अर्शदीप सिंगमध्येझहीर खानप्रमाणेच अद्भुत करण्याची क्षमता असल्याचे कुंबळेने म्हटले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात अर्शदीपने ४ षटकांत ३ बळी पटकावले होते. लक्षणीय बाब म्हणजे त्याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला स्वस्तात माघारी पाठवले होते. 

खरं तर अर्शदीप सिंगने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. अवघ्या काही महिन्यातच त्याने आपल्या खेळीने जगाचे लक्ष वेधले. २३ वर्षीय युवा गोलंदाजाने त्याच्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांना घाम फोडला. आयपीएलमधील पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कुंबळेने जवळून अर्शदीपची गोलंदाजी पाहिली आहे. त्यामुळे त्याने आपण अर्शदीपच्या गोलंदाजीचा साक्षीदार असल्याचे सांगितले. 

अर्शदीप झहीर खानसारखा कामगिरी करू शकतो - कुंबळे देशासाठी खेळलेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झहीर खानशी तुलना करताना कुंबळेने ESPNcricinfo च्या ओपन माइक कार्यक्रमात सांगितले की, "मला अर्शदीपकडून भारतासाठी काही अद्भुत गोष्टी करण्याची अपेक्षा आहे." अखेरच्या षटकांमध्ये यॉर्कर टाकण्याची त्याच्यात क्षमता आहे. तसेच तो नवीन चेंडूसह प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतो असे कुंबळेने म्हटले.

"मी अर्शदीप सिंगच्या खेळीने खूप प्रभावित झालो आहे, तो इथपर्यंत कसा पोहचला ते मला माहिती आहे. मी त्याच्यासोबत तीन वर्षे काम केले आणि टी-२० फॉरमॅटमध्ये त्याचा कसा विकास झाला आहे हे मी पाहू शकलो. मागील वर्षीच त्याने दबावात गोलंदाजी करून स्वत:ला सिद्ध केले होते." अशा शब्दांत अनिल कुंबळेने अर्शदीप सिंगचे कौतुक केले आहे. 

किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानअर्शदीप सिंगअनिल कुंबळेझहीर खान
Open in App