नवी दिल्ली : आरसीबीला प्ले-आॅफमध्ये स्थान मिळवता न आल्यामुळे कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी माफी मागितली. आमचा संघ पुढच्या मोसमात दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला. आरसीबीने यंदाच्या मोसमात १४ पैकी ८ सामने गमावले. हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी राहिला. कमकुवत गोलंदाजी आक्रमक व फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्यात आलेले अपयश, यामुळे आरसीबीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
कोहलीने टिष्ट्वट केले की, ‘आम्हाला अनुकूल निकाल मिळवता आले नाही. आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान वाटत नाही. आम्हाला चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत, त्यामुळे मी माफी मागतो. हे सर्व जीवनाचा भाग आहे. तुम्हाला अपेक्षित असलेले यश मिळेतच असे नाही. पुढच्या मोसमात कशी कामगिरी करायची, हे खेळाडूंनी समजून घ्यायला हवे. पुढच्या मोसमात परिस्थिती बदललेली राहील, अशी आशा आहे.’