Join us  

संघाच्या विजयात योगदान दिल्याचा आनंद- जेमिमा रॉड्रिग्ज

औरंगाबाद-  बडोद्याविरुद्ध आपण आडवा फटका मारून बाद झाले होते. त्यामुळे या लढतीत सरळ बॅटने खेळून पूर्ण ५० षटके खेळण्याचा आपले नियोजन होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:06 PM

Open in App

औरंगाबाद-  बडोद्याविरुद्ध आपण आडवा फटका मारून बाद झाले होते. त्यामुळे या लढतीत सरळ बॅटने खेळून पूर्ण ५० षटके खेळण्याचा आपले नियोजन होते. संघासाठी खेळून द्विशतक झळकावले आणि विजयात योगदान दिल्याचा विशेष आनंद वाटतोय, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती दणकेबाज द्विशतकी खेळी करणा-या मुंबईची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज हिने.या खेळीबद्दल जीझसचे आभार मानणा-या जेमिमाने महाराष्ट्राविरुद्ध झुंजार खेळ करून विजय मिळवण्याचा आपला निर्धार असल्याचे सांगितले. सीनिअर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय बाळगणारी जेमिमा ही मुंबई संघाची रनमशीनच असल्याचे याआधीही सिद्ध झाले आहे. सध्या औरंगाबाद येथे सुरू असलेल्या अंडर १९ पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत तीन लढतीत १९८.५० च्या सरासरीने २ शतकांसह ३९७ धावांचा पाऊस पाडणा-या जेमिमाची याच वर्षी बंगळुरू येथे सीनिअर भारतीय महिला संघाच्या शिबिरासाठीदेखील निवड झाली होती.या स्पर्धेत सहभागी होण्याआधी जेमिमाने ४० सामन्यांत ४ शतकांसह २०९६ धावा केल्या आहेत. गत वर्षी जेमिमाने अंडर १९ सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत ६ सामन्यांत ५ वेळेस नाबाद राहताना ३७६ धावांच्या सरासरीने धावा केल्या. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे वयाच्या साडेबारा वर्षांपासून खेळणा-या जेमिमाने अंडर १७ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही प्रतिनिधित्व केले आहे.