- मनोहर कुंभेजकरमुंबई - विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सळोकीपळो करुन सोडणाऱ्या आणि रोहित शर्मा, विराट कोहलीची विकेट घेऊन क्रिकेट रसिकांना चकित करणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघाचा 'मराठमोळा' गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा बोरीवलीत सत्कार करण्यात आला. सौरभ नेत्रावळकर यांनी सुरेख गाणे गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. समारंभाच्या प्रारंभी ज्येष्ठ क्रिकेटपटू दिवंगत पॅडी उर्फ पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मल्ल्या वराडकर फ्रेन्डस क्रिकेट क्लब तर्फे बोरिवली येथे रेलनगर रहिवासी असोसिएशनच्या सभागृहात हा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोरेगांव येथील पाटकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उदय माशेलकर, एअर इंडिया संघाचे माजी कर्णधार शेखर वराडकर , मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार जगदिश आचरेकर, कामगार नेते सदानंद चव्हाण, मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक श्रीकांत दादरकर, राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सौरभ नेत्रावळकर यांचे पिताश्री नरेश नेत्रावळकर, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजु देसाई, महिला क्रिकेट प्रशिक्षक वैशाली भिडे, संगीत संयोजक भूषण मुळे, उद्योजक गजानन वावीकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.