नवी दिल्ली : मुश्ताक अली करंडक क्रिकेट सामन्यादरम्यान बीसीसीआय आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हैदराबादचा कर्णधार अंबाती रायुडूवर दोन सामन्यांची बदी घालण्यात आली. ११ जानेवारी रोजी कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात हा प्रसंग घडला होता.
रायुडू आगामी विजय हजारे करंडकात हैदराबादकडून पहिले दोन्ही सामने खेळू शकणार नाही. मैदानी पंच अभिजित देशमुख, उल्हास गंधे आणि तिसरे पंच अनिल दांडेकर यांनी दिलेल्या अहवालानुसार या घटनेसाठी हैदराबाद संघाच्या व्यवस्थापकाच्या भूमिकेचीदेखील चौकशी करण्यात येत आहे.
सामन्यादरम्यान हैदराबाद संघाचा डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करीत असलेला मेहंदी हसन याने चेंडू पायाने रोखला. त्याचवेळी त्याचा पाय सीमारेषेला लागला होता. तथापि, मैदानी पंचाने याप्रकरणी तिसºया पंचाची मदत घेतली नव्हती. त्यावर चौकार देण्याऐवजी करुण नायरला दोनच धावा मिळाल्या. कर्नाटकने पाच गडी गमावून २०३ धावा उभारल्या होत्या. कर्नाटकच्या धावसंख्येत या दोन धावांची भर पडताच हैदराबादने हा सामना गमावला. त्याआधी, हैदराबादने २० षटकांत नऊ बाद २०३ धावा उभारल्या होत्या. रायुडूने सामन्यानंतर मैदानी पंचांसोबत हुज्जत घातल्याने दुसरा सामना सुरू करण्यास बराच वेळ लागला होता. (वृत्तसंस्था)