पणजी : देशात पहिल्यांदाच होणा-या १७ वर्षांखालील फुटबॉल महासंग्रामासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी अमरजित सिंह याची निवड करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने अमरजितच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारतीय युवा संघ सध्या गोवा येथे सराव करीत आहे. बंगळुरु येथील विशेष शिबिरानंतर हा संघ गोव्यात दाखल झाला होता. मंगळवारी कर्णधार निवडीवर चर्चा झाली आणि अमरजितकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले.
कर्णधारपदाच्या शर्यतीत चार खेळाडूंची नावे होती. त्यातून एकाची निवड करायची, याबाबत प्रशिक्षकांपुढेही आव्हान होते. संघात ताळमेळ योग्य जुळावा, हाच उद्देश प्रशिक्षक लुई नोर्टन दी मातोस यांचा होता. त्यामुळे त्यांनी सर्व २७ खेळाडूंचे मत घेतले. कर्णधाराची पसंत कागदावर लिहून द्या, अशी अभिनव कल्पना त्यांनी काढली. त्यातून अमरजितची निवड झाली. पहिल्या पसंतीस ५ गुण, दुसºया पसंतीस ३ गुण व शेवटच्या पसंतीस एक गुण देण्यात येत होता. जितेंद्र सिंह याला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले. गेल्या वर्षी १६ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सुरेश सिंह हा खेळाडूंच्या पसंतीत तिस-या क्रमांकावर राहिला. बचावपटू संजीव स्टालिन चौथ्या क्रमांकावर राहिला. दरम्यान, स्पर्धेला ६ आॅक्टोबरपासून सुरुवात होत आहे. दिल्लीत भारताचा पहिला सामना होईल.
>अमरजितविषयी...
अमरजितचा जन्म मणिपूरचा. त्याला फुटबॉल खेळण्यासाठी त्याच्या काकाने तयार केले. त्याच्यातील कौशल्य हे एखाद्या खेळाडूप्रमाणेच होते. त्यामुळे त्याला लवकरच चंदिगड फुटबॉल अकादमीत टाकण्यात आले. या अकादमीतून त्याने राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर चमक दाखवली. १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी जेव्हा निवडकर्ते खेळाडूंचा शोध घेत होते तेव्हा निवड चाचणीसाठी अमरजितला बोलाविण्यात आले. त्याच्या खेळाने निवडकर्ते प्रभावित झाले आणि त्याला शिबिरासाठी निवडण्यात आले. अमरजितमधील नेतृत्वगुणही उत्तम आहेत. त्यामुळे तो भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास निवडकर्त्यांना आहे.