ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) गुरुवारी मुंबईत दाखल झाला. मुंबईच्या माटुंगा येथील घरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. दोन-अडीच महिने मुलगी आर्यापासून दूर असलेल्या अजिंक्यनं सगळ्यात आधी तिला मिठी मारली. ढोल ताशा, तुतारी, फुलांची उधळण, रेड कार्पेट असं दणक्यात अजिंक्यचे स्वागत करण्यात आले. यावेळी अजिंक्यनं त्याची पत्नी राधिकानं दिलेल्या खास सूचनेची माहिती सांगितली. मुंबईत येशील तेव्हा चांगले कपडे घालून ये, अशी सूचना राधिकानं अजिंक्यला केली होती. ती का केली होती, याची कल्पना मात्र अजिंक्यला मुंबईत दाखल झाल्यानंतर आली.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत अजिंक्यनं त्याचे नेतृत्व कौशल्य जगाला दाखवून दिले. मेलबर्नवरील अविस्मरणीय शतक. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत चाललेली यादी पाहूनही तो डगमगला नाही, उलट नव्या दमाच्या सहकाऱ्यांना घेऊन कागांरूंशी भिडला. आर अश्विन व हनुमा विहारी यांची झुंज.. रवींद्र जडेजाची प्रभावी गोलंदाजी.. मोहम्मद सिराजचा अफलातून मारा, शार्दूल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची दमदार खेळी, चेतेश्वर पुजारानं रोवलेला नांगर आणि रिषभ पंतची तुफान फटकेबाजी... या सर्वांनी मिळून हा दौरा अश्विस्मरणीय केला.
रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचे स्वागत केले गेले. यावेळी अजिंक्यनं एक किस्सा सांगितला... तो म्हणाला,'' राधिका म्हणाली चांगले कपडे घालून ये, मला वाटलं काय फरक पडतो, आर्या तुला बघून खुश होईल असं ती म्हणाली. इथे आल्यावर सरप्राईज मिळालं आणि खूप आंनद वाटतोय. भारताच्या विजयाचे श्रेय सर्वांचे आहे.'' यावेळी अजिंक्यनं सोसायटीतील सदस्यांचेही आभार मानले.
अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाचे मोठे झाले आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली. याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले. या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.