Join us  

'दे दणादण'! भारताच्या १० विकेट्स घेणाऱ्या एजाज पटेलची धुलाई; २ ओव्हरमध्ये दिल्या ३१ धावा

विजयसाठी २१८ धावांचं आव्हान होतं, पण दोघांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर T20 सामना आधीच संपला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 3:22 PM

Open in App

अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू असलं तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या टी२० लीग स्पर्धांचा धुमाकूळ सुरू आहे. न्यूझीलंडच्या टी२० लीग सुपर स्मॅश स्पर्धेत एक सामना खेळण्यात आला. सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स विरूद्ध कँटनबरी असा हा सामना रंगला होता. या सामन्यात तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. फलंदाजांनी या सामन्यावर तुफान वर्चस्व गाजवल्यामुळे गोलंदाज फारच वाईट अवस्थेत असल्याचे दिसले. मुंबईच्या मैदानात भारताचे एकाच डावात १० बळी घेणारा गोलंदाज एजाज पटेल याला या धडाकेबाजी खेळीचा फटका बसला. त्याच्याविरूद्ध दोन फलंदाजांनी तब्बल ३००च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या. कर्णधार टॉम ब्रुसच्या ३६ चेंडूत ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स संघाने हा स्कोअर उभा केला. याशिवाय यष्टीरक्षक डेन क्लेवरने ३२ चेंडूत ६१ धावांची खेळी केली.

कँटनबरीच्या फलंदाजांनी या आव्हानाचा चांगलाच समाचार घेतला. लक्ष्य सोपं नव्हतं पण मिडल ऑर्डरच्या दोन धडाकेबाज फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. दोघांनी इतकी तुफान फटकेबाजी केली की त्यांचा संघ १७.५ षटकात विजयी झाला. कँटनबरीने ५ गड्यांच्या मोबदल्यात २१८ धावा कुटल्या. २५ वर्षाचा हेन्री सिपले आणि २८ वर्षाचा कॅम फ्लेचर दोघांनी या विजयात मोठा वाटा उचलला.

एजाज पटेलची धुलाई!

सिपले आणि फ्लेचर यांनी दे दणादण फलंदाजी केली. त्यांनी एजाज पटेलची जोरदार धुलाई केली. कॅम फ्लेचरने ६ षटकार आणि एक चौकार लगावत २१ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. तर सिपलेने ११ चेंडूत ३५४ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ३९ धावा केल्या. एजाज पटेलने २ षटकं टाकली. त्यात त्याला ३१ धावा कुटल्या. त्याने एक विकेट घेतली पण या दोन फलंदाजांना रोखणं त्याला जमलं नाही.

टॅग्स :एजाझ पटेल
Open in App