अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये कायम, बीसीसीआय करणार अधिकृत घोषणा

Ahmedabad team : काही आठवड्यांआधी नव्या दोन संघांचा लिलाव करण्यात आला त्यावेळी संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी समूहाने लखनौ संघ खरेदी करण्यासाठी ७ हजार ९० कोटी रुपयांची बोली लावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:17 AM2021-12-28T05:17:43+5:302021-12-28T05:18:15+5:30

whatsapp join usJoin us
Ahmedabad team to remain in IPL, BCCI to make official announcement | अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये कायम, बीसीसीआय करणार अधिकृत घोषणा

अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये कायम, बीसीसीआय करणार अधिकृत घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएल २०२२ साठी अमेरिकेची कंपनी सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबाद या नव्या संघावर लावलेली महागडी बोली वादात अडकली होती. तथापि आता सीव्हीसीला हिरवा झेंडा मिळाल्याचे वृत्त आहे. अहमदाबादचा समावेश निश्चित मानला जात असून याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीसीआयकडून लवकरच अपेक्षित आहे.

 सीव्हीसीची सट्टेबाजी कंपनीत कथित गुंतवणूक असल्याचा तपास करण्यासाठी बीसीसीआयने पॅनल नेमले होते. न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या तीन सदस्यीय चौकशी पॅनलने आपला अहवाल बीसीसीआयला सोपविला आहे. ‘क्रिकबज’ या संकेतस्थळानुसार आयपीएल संचालन परिषद आणि बीसीसीआयने सीव्हीसीच्या सहभागास मंजुरी दिल्याचे कळते.

पॅनलने सीव्हीसीबाबत काढलेला निष्कर्ष बीसीसीआयने तपासला. तो स्वीकारायचा की, नाकारायचा हे सर्वस्वी बीसीसीआयवर अवलंबून असेल. तथापि अहमदाबाद या नव्या फ्रॅन्चायजीला खेळण्यास परवानगी मिळणार हे निश्चित असल्याचे  वृत्तात म्हटले आहे.
आयपीएलच्या पुढील सत्रात दहा संघांचा समावेश असेल. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ असून मेगा ऑक्शनमध्ये सर्व दहा संघ लवकरच सहभागी होणार आहेत.

काही आठवड्यांआधी नव्या दोन संघांचा लिलाव करण्यात आला त्यावेळी संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी समूहाने लखनौ संघ खरेदी करण्यासाठी ७ हजार ९० कोटी रुपयांची बोली लावली होती. याशिवाय अमेरिकन कंपनी सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबादचे हक्क स्वत:कडे घेण्यासाठी ५ हजार ६२५ कोटी रुपये मोजले. बीसीसीआयने आरपीएसजी समूृहाला ताबडतोब मान्यता प्रदान केली त्याचवेळी सीव्हीसी कॅपिटल्सला बोर्डाने परवानगी न देता राखून ठेवली होती.

या कंपनीची सट्टेबाजीत गुंतवणूक असल्याचा आरोप होताच बीसीसीआयने तथ्य जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय पॅनल नेमले. या पॅनलने आपला अहवाल सोपविल्यामुळे अहमदाबाद संघ सीव्हीसीकडे राहील हे जवळपास निश्चित झाले. आयपीएलचे मेगा ऑक्शन बंगळुरु येथे फेब्रुवारीत होणार आहे.

Web Title: Ahmedabad team to remain in IPL, BCCI to make official announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.