Join us  

महाराष्ट्रातील माती टाकल्यानंतरही खेळपट्टीचे रहस्य कायम; इकानातील सर्व ९ खेळपट्टया बदलल्या, निकाल शून्य

वन डे विश्वचषकात रविवारी भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीकडे दिमाखात पाऊल टाकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 5:12 PM

Open in App

किशोर बागडे

लखनौ : वन डे विश्वचषकात रविवारी भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीकडे दिमाखात पाऊल टाकले. भारताने सलग सहावा सामना जिंकल्यानंतरही क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांनी पैसा वसूल खेळ होऊ न शकल्याबद्दल इकानातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमच्या खेळपट्टीला दोषी धरले आहे. येथे एकूण ९ खेळपट्टया आहेत. भारत- इंग्लंड सामना चौथ्या खेळपट्टीवर झाला.पण सुरूवातीपासूनच

खेळपट्टी अशी वागली की जिथे फलंदाज कोणत्याही क्षणी बाद होऊ शकत होता. तुम्ही सेट झालाय अन् आरामात फटकेबाजी करताय, असे या खेळपट्टीवर होणे शक्य नव्हते. मग या खेळपट्टीतच काही दोष आहे का? काही महिने मागे जाऊया.. भारत- न्यूझीलंड टी-२० सामना आणि त्यानंतर आयपीएलच्या ७ सामन्यात खेळपट्टीचे दुखणे कायम राहिल्याने कठोर टीका झाली होती. न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ८ बाद ९९ धावांपर्यंतच मर्यादित राहिल्याने टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने खेळपट्टीविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यावर बीसीसीआयने यूपीसीएला निर्देश देत सर्व ९ खेळपट्टया खोदून नव्याने बनविण्याचे निर्देश दिले. त्याआधी क्यूरेटर बदलण्यात आला. महाराष्ट्रातून चार ट्रक माती मागविण्यात आली. याशिवाय ओडिशातूनही काही माती आणण्यात आली होती. विश्वचषकाआधी नव्या खेळपट्या सज्ज करण्यात आल्या होत्या. तरीही परिणाम मात्र शून्यच.

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ३११ धावांचा अपवाद वगळता गेल्या आठ डावांतकोणत्याही संघाने ३०० चा आकडा गाठलेला नाही. अन्य मैदानांवर मात्र धावांचा पाऊस पडताना दिसतो.एका जाणकाराने सांगितले की इकाना मैदान गोमती नदीच्या परिसरात आहे. पूर्वी येथे चिखल आणि कचऱ्याचे ढिग होते. त्यामुळे काळ्या मातीत ओलावा असतो. ‘स्पोर्टिंग विकेट’ बनविण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल.

इकानातील विश्वचषक लढती...

  1. १२ ऑक्टोबर: द.आफ्रिका ७ बाद ३११, ऑस्ट्रेलिया ४०.५ षटकांत सर्वबाद १७७.
  2. १६ ऑक्टोबर: श्रीलंका ४३.३ षटकानत सर्वबाद २०९, ऑस्ट्रेलिया ३५.३ षटकांत ५ बाद २१५.
  3. २१ ऑक्टोबर: नेदरलॅन्ड्स ४९.४ षटकांत सर्वबाद २६२, श्रीलंका ४९.२ षटकांत ५ बाद २३६.
  4. २९ ऑक्टोबर: भारत ५० षटकांत ९ बाद २२९, इंग्लंड ३४.५ षटकांत सर्वबाद १२९.  

कुलदीपचा तो ‘बॉल आफ द वर्ल्ड कप’!टीम इंडियाचा मुख्य फिरकी गोलंदाज, लखनौशेजारच्या कानपूरचा ‘लोकल बॉय’ चायनामन कुलदी यादवने इंग्लिश कर्णधार जोस बटलरला पश्चात्ताप करण्यास भाग पाडले. कुलदीपने टाकलेल्या या चेंडू ला ‘बॉल आफ द वर्ल्ड कप’! असे संबोधले जात आहे. खेळपट्टीवर गवत नसल्याने आणि दुसरी इनिंग सुरू झाल्याने खेळपट्टीवर पॅचेस तयार झाले होते. गोलंदाजीला येताच पहिल्या चेंडूवर कुलदीपने बटलरच्या आकलनापलिकडचा चेंडू टाकला. टप्पा पडताच चेंडू थेट यष्टिंवर जावून धडकला होता. हा क्षण सोशल मीडियाच्या ट्रेंडिंगमध्ये आहे. एका युजरने लिहिले,‘ फ्रेम करून ठेवा. व्हॉट अ बॉल बाय कुलदीप यादव! बटलर क्लिन अप!!’

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध इंग्लंडलखनऊकुलदीप यादव