बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याला जाहीर माफी मागावी लागली. भारतात त्यानं हिंदूंच्या काली पूजाला हजेरी लावली होती, त्यानंतर त्याला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. हिंदूंच्या उत्सावाला उपस्थित राहिल्यामुळे शकिबवर कट्टरवाद्यांनी टीका केली आणि त्यामुळे शकिबनं जाहीर माफी मागितली. ''मी स्टेजवर अवघे दोन मिनिटच राहिलो असेन. त्यानंतर लोकं त्याची चर्चा करू लागले आणि मी तेथे उद्धाटन केलं, अशी चर्चा रंगली,''असे शकिबनं सांगितले.
तो पुढे म्हणाला,''मी असे करणार नाही आणि एक मुस्लीम असल्यानं मी तसं केलं नाही, परंतु मला तिथे नको जायला हवं होतं. त्यासाठी मी माफी मागतो. मी माझ्या धर्माच्या सर्व प्रथांचं नेहमी पालन करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. कृपया मला माफ करा, मी काहीच चुकीचं केलेलं नाही.'' 
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, शकिबला फेसबुक लाईव्हवरून कट्टरपंथीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.  शाहपूर तालुकदार येथे राहणाऱ्या मोहसीन तालुकदार यानं रविवारी १२.०६ वाजता फेसबुक लाईव्ह केले आणि त्यात त्यानं शकिब याचे वागणे मुस्लीमांच्या भावना दुखावणारे आहे, असा दावा केला. त्यानंतर या व्यक्तीनं क्रिकेटपटूचे तुकडेतुकडे करण्याची धमकी दिली. गरज पडल्यास त्यासाठी सिलहेट ते ढाका चालत येण्याची तयारीही त्यानं दर्शवली. धमकी देणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
शकिबला आयसीसीच्या अँटी करप्शन विभागानं दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली होती आणि २९ नोव्हेंबरला ती शिक्षा पूर्ण झाली. शकिब आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.  शकिबनं ५६ कसोटींत ३८६२ धावा आणि २१० विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय त्यानं २०६ वन डे व  ७६ ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे ६३२३ धावा व २६० विकेट्स आणि १५६७ धावा व ९२ विकेट्स घेतल्या आहेत.