कोलंबो - कर्णधार जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने श्रीलंका दौऱ्यामध्ये नवा इतिहास रचला आहे. सोमवारी तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेवर 42 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेवर 3-0 ने मात केली. परदेशात क्लीन स्विप करण्याची इंग्लंडची गेल्या 55 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1963 साली इंग्लंडने न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये 3-0 ने पराभूत केले होते.
पहिल्या दोन कसोटीत सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला कणखरता दाखवता आली नाही. मात्र कुशल मेंडिस(86) आणि रोशन सिल्व्हा (65) यांनी सहाव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी करत विजयाची आस कायम ठेवली होती. मात्र एकवेळ श्रीलंकेचे नऊ फलंदाज 226 धावांवरच माघारी परतले होते. पण तळाच्या मलिंदा पुष्पकुमार याने 40 चेंडूत 42 धावा फटकावत सामन्यात रंगत आणली. अखेरीच लीच याने ही भागीदारी तोडून इंग्लंडला विजय मिळवून दिला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 284 धावांवर गारद झाला.
इंग्लंडने श्रीलंकेच्या संपूर्ण दौऱ्यात वर्चस्व गाजवले. सुरुवातीला एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने 3-1 ने विजय मिळवला. त्यानंतर एकमेव टी-20 सामन्यातही बाजी मारली होती.