Join us

आफ्रिकन क्रिकेटपटू बोरिवलीत घेतोय प्रशिक्षण; रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मखाया एनटिनी याचा मुलगा थँडो एनटिनी सध्या बोरिवलीमध्ये क्रिकेटचे धडे गिरवत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 15:56 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मखाया एनटिनी याचा मुलगा थँडो एनटिनी सध्या बोरिवलीमध्ये क्रिकेटचे धडे गिरवत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांचे थँडोला मार्गदर्शन लाभत आहे.

गोराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये थँडो रोज लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. जून महिन्यापर्यंत त्याचे प्रशिक्षण येथे सुरू राहील. विशेष म्हणजे आपल्या इतर शिष्यांप्रमाणेच लाड यांनी थँडोकडून प्रशिक्षणासाठी एकही रुपया घेतलेला नाही. लाड यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना म्हटले की, ‘२१ वर्षीय थँडोमध्ये मोठी गुणवत्ता आहे. त्याच्यामध्ये उच्च क्रिकेट खेळण्याची क्षमता असून येत्या दोन वर्षांत तो नक्कीच दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. त्याच्या ग्रीपमध्ये, फटके मारण्याच्या शैलीमध्ये काही बदल केले आणि त्याचा त्याला फायदाही होत आहे. थँडो रोज आपल्या खेळामध्ये झालेल्या सुधारणेविषयी सांगतो.’ लाड सध्या आपल्या अकदामीसाठी जागेच्या शोधात असून, ‘सरकारच्यावतीने जागा मिळाल्यास आणखीन क्रिकेपटू घडविण्यास मदत होईल,’ असेही लाड यांनी सांगितले. 

असा आला बोरिवलीमध्ये

भारतीय रेल्वेकडून सध्या कनिष्ठ पातळीवर क्रिकेट खेळत असलेल्या चंद्रास मंचेकर यांनी थँडोला लाड सरांकडे आणले. माजी दिग्गज क्रिकेटपटूंची लीग असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहाय्यक फिजिओ असलेल्या मंचेकर यांच्या संपर्कात आलेल्या मखायाने आपल्या मुलाला भारतात प्रशिक्षक मिळवून देण्यास विनंती केली. यावर मंचेकर यांनी मखायाला लाड सरांचे नाव सुचवले आणि थँडोचा दक्षिण आफ्रिकेतून बोरिवलीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

 

ऑस्ट्रेलियन, विंडीज खेळाडू मार्गावर

लाड सरांच्या मार्गदर्शनात झालेल्या प्रगतीची माहिती मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूंची मुलेही लवकरच बोरिवलीला येणार असल्याची माहिती मिळाली. ‘ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू अँँड्र्यू सायमंड्स आणि विंडीजचा माजी कर्णधार कार्ल हुपर हे त्यांच्या मुलांसाठी माझ्या संपर्कात आहेत,’ असे लाड यांनी सांगितले.

भारतात येण्याचा मोठा फायदा झाला. लाड यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या खेळामध्ये मोठे बदल झाले. पूर्वी मला ड्राईव्ह फटके मारताना येणाऱ्या अडचणी येथे दूर झाल्या. येथे येण्याचा निर्णय चुकला नाही, याचा आनंद आहे. - थँडो एनटिनी

टॅग्स :मुंबईरोहित शर्मा
Open in App