पक्तिका प्रांतात पाकिस्तान लष्कराने केलेल्या कथित हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन स्थानिक क्रिकेटपटू मृत्युमुखी पडले. यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याशी होणाऱ्या आगामी तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेण्याची अधिकृत घोषणा केली. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय मृत खेळाडूंना श्रद्धांजली वाहिली आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
या हल्ल्यात कबीर आगा, सिबगतुल्ला आणि हारून या तीन होतकरू क्रिकेटपटूंना आपले प्राण गमवावे लागले. बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना, मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "बीसीसीआय पक्तिका प्रांतात झालेल्या भ्याड सीमापार हवाई हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या तीन तरुण अफगाण क्रिकेटपटू - कबीर आगा, सिबगतुल्ला आणि हारून यांच्या दुःखद निधनाबद्दल तीव्र दुःख आणि संवेदना व्यक्त करते."
दहशतवादी कृत्याचा निषेध
बीसीसीआयने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सैकिया म्हणाले, "या गंभीर दुःखाच्या क्षणी बीसीसीआय अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, क्रिकेट समुदाय आणि दिवंगत खेळाडूंच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त करते आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करते." क्रिकेट विश्वाने या घटनेवर शोक व्यक्त केला असून, अशा हिंसक कृत्यांमुळे खेळाच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.