दुबई : आशिया चषकातील साखळी सामन्यात तळाच्या फलंदाजांनी चांगलीच झुंज दिल्याने अफगाणिस्तानच्या संघाने बांगलादेशसमोर २५५ धावांचे आव्हान ठेवले. राशिद खान याने स्फोटक अर्धशतकी खेळी केली. त्याने गुलबदिन नेबसोबत ९५ धावांची भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बांगलादेशच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. सलामीवीर इन्सानुल्लाह याला फक्त ८ धावांवर असताना अबु हिदर याने बाद केले. त्यानंतर अबू यानेच रहमत शाह याला बाद करत अफगाणिस्तानला दुसरा मोठा धक्का दिला. मोहम्मद शहजाद एका बाजूने खिंड लढवत होता. मात्र अनुभवी शाकिबने त्याला अबू हिदरकडे झेल देण्यास भाग पाडले. कर्णधार असगर अफगाण हा देखील फक्त ८ धावा करून बाद झाला. मधल्या फळीतील फलंदाज हशमतुल्लाह शाहिदी याने बांगलादेशच्या भेदक माऱ्याला चांगली झुंज दिली. त्याने ९२ चेंडूत ३ चौकारांच्या साहाय्याने ५८ धावा केल्या. अफगाणचा सातवा गडी मोहम्मद नबी बाद झाला तेव्हा संघाच्या १६० धावा होत्या. त्यानंतर गुलबदिन नेब आणि राशिद खान यांनी बांगलादेशच्या गोलंदाजीची पिसे काढायला सुरुवात केली. नेब याने ३८ चेंडूच पाच चौकारांच्या साहाय्याने ४२ धावा केल्या. तर राशिद खान याने ३२ चेंडूत ५७ धावा केल्या. राशिदने
८ चौकार आणि एक षटकार
ठोकला.
बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने चार तर अबू हिदर याने २ गडी बाद केले. रुबेल हुसेनला एक बळी मिळाला. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान : ५० षटकांत ७ बाद २५५ धावा (हशमतुल्लाह शाहिदी ५८, राशिद खान नाबाद ५७; शाकिब अल हसन १०-१-४२-४, अबू हिदर ९-१-५०-२.)