Join us  

भारतात महिला क्रिकेटसाठी अच्छे दिन - मिताली राज

विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतरही क्रिकेटप्रेमींनी महिला संघाच्या खेळाचे कौतुक केले. त्यामुळेच भारताची कर्णधार मिताली राज हिने सध्या भारतात महिला क्रिकेटसाठी अच्छे दिन आले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 2:17 PM

Open in App

मुंबई, दि. 26 -  इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली. अंतिम फेरीत पराभूत झाल्याने भारतीय संघाल उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र ही विश्वचषक स्पर्धा आणि भारतीय महिला संघाला भारतात भरपूर प्रसिद्धी मिळाली. विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतरही क्रिकेटप्रेमींनी महिला संघाच्या खेळाचे कौतुक केले. त्यामुळेच भारताची कर्णधार मिताली राज हिने सध्या भारतात महिला क्रिकेटसाठी अच्छे दिन आले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक स्पर्धा आटोपून भारतात परतलेल्या मिताली राज आणि तिच्या सहकाऱ्यांचे आज मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भारताची कर्णधार मिताली राज हिने भारतीय महिला संघाला मिळालेल्या भरभरून पाठिंब्याबाबत समाधान व्यक्त केले "सध्या भारतात महिला क्रिकेटसाठी चांगले दिवस आले आहेत, मी खूप खूश आहे, असे मिताली म्हणाली.  महिला खेळाडूंसाठी भारतात एक लीग खेळावली पाहिजे जेणे करून आतंरराष्ट्रीय स्तरासाठी आणखी चांगले खेळाडू मिळतील. तसेच खेळाडूंचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मितालीने व्यक्त केली. आपल्या कर्णधारपदाबाबतही मिताली हिने यावेळी भाष्य केले, मी संघासाठी माझे सर्वोत्तम योगदान देते. कर्णधार म्हणून मी सहकाऱ्यांचा सल्ला घेते. संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली याचा आनंद आहे. मी अभिमानाने सांगते की मुलींनी चांगला खेळ केला आहे आणि मी कर्णधार म्हणून खुश आहे, असे मिताली म्हणाली.  त्याआधी मायदेशात परतल्यावर झालेल्या अभूतपूर्व स्वागताने भारतीय संघातील महिला खेळाडू भारावून गेल्या आहेत. अशा स्वागताचा आमच्या पैकी कुणालाच अनुभव नव्हता. क्रीडाक्षेत्रात महिलांची कामगिरी उंचावत आहे हे सुचिन्ह आहे. त्याचा आनंद व्यक्त व्हायलाच हवा, असे मिताली म्हणाली होती.