Join us  

Hashim Amla Retired: "हे पचायला मला काही दिवस...", हाशिम आमलाची निवृत्ती अन् एबी डिव्हिलियर्स भावूक

Hashim Amla and ab de villiers: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज हाशिम आमलाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 2:11 PM

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज हाशिम आमलाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या जवळच्या सहकाऱ्याने निवृत्ती घोषणा करताच मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स भावूक झाला. डिव्हिलियर्सने ट्विटच्या माध्यमातून हाशिम आमलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निवृत्तीची घोषणा करण्यासोबतच आमलाने सरे कंट्री क्लबला कळवले आहे की तो 2023 च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाही.

दरम्यान, आमलाने आपल्या दोन दशकाच्या क्रिकेट कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने एबी डिव्हिलियर्ससोबत काही अविस्मरणीय क्षण घालवले. दोन्ही आफ्रिकन दिग्गजांची मैत्री खूप घट्ट होती आणि यामुळेच आमलाच्या निवृत्तीची बातमी ऐकून डिव्हिलियर्स खूप भावूक झाला.

एबी डिव्हिलियर्स भावूक डिव्हिलियर्सने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "हाशिम आमला, कुठून सुरूवात करू? हे सोपे नाही. हे पचायला मला काही दिवस, काही आठवडे, काही महिने किंवा काही वर्षे लागू शकतात. मी खरंच तुझ्याबद्दल एक पुस्तक लिहू शकतो. हमाम, नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तू नेहमीच एक भाऊ म्हणून राहिला आहेस ज्यामुळे मला अनेक मार्गांनी सुरक्षित वाटले. पण नंतर तू नेहमी अनोखी फलंदाजी केली. शांत, संयमी, सातत्यपूर्ण, धैर्यवान, कुशल आणि नम्र, नेहमी संघासाठी, देशासाठी. तू मला अशा प्रकारे प्रेरित केले की हे मी स्पष्ट करू शकत नाही. त्यामुळे आज मी तुला सलाम करतो मित्रा." 

हाशिम आमलाची कारकिर्द हाशिम अमलाने सर्व फॉरमॅटसह त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 34,104 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 124 कसोटी सामन्यांमध्ये 9,282 धावा केल्या. यामध्ये त्याने 28 कसोटी शतके झळकावली आहेत. 2012 मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध नाबाद 311 धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. तो दक्षिण आफ्रिकेकडून त्रिशतक झळकावणारा पहिला खेळाडू आहे. त्याने 181 वन डे सामन्यांमध्ये 27 शतकांसह 8,113 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 44 ट्वेंटी-20 सामन्यात 1,277 धावा केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सहाशिम आमलाद. आफ्रिकाआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App