Join us  

U Turn! विराट कोहलीबाबत 'खोटी' माहिती दिल्याबद्दल एबी डिव्हिलियर्सने मागितली माफी

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) सध्या कुठेय, तो क्रिकेटपासून दूर का आहे, त्याचं वैयक्तिक कारण म्हणजे नेमकं काय आहे....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:39 AM

Open in App

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) सध्या कुठेय, तो क्रिकेटपासून दूर का आहे, त्याचं वैयक्तिक कारण म्हणजे नेमकं काय आहे.... अशा बऱ्याच प्रश्नांचे वादळ चाहत्यांच्या मनात सध्या घोंगावत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सुपरस्टार एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers ) याने काही दिवसापूर्वी चाहत्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. विराट व अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार असल्याचे एबी डिव्हिलियर्सने एका यू ट्यूब चॅनेलवर सांगितले. पण, आता एबीने यू टर्न मारल्याचे दिसत आहे. त्याने चुकीची माहिती दिल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली.

विराटने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली.. तिसऱ्या कसोटीसाठी त्याने अद्याप बीसीसीआयला उपलब्धता कळवलेली नाही. पण, तो तिसरी व चौथी कसोटी खेळण्याची शक्यताही कमी असल्याचे वृत्त समोर येत आहे. पाचव्या कसोटीत तो खेळेल अशी आशा आहे. त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे याची कुणालाच कल्पना नाही. बीसीसीआयने विराटच्या निर्णयाचा आदर करा आणि उगाच काही चर्चा करू नका, अशी विनंती केली होती. 

काही दिवसांपूर्वी एबी डिव्हिलयर्सने यू ट्यूब चॅनेलवर सांगितले होते की, तो ( विराट) बरा आहे. तो त्याच्या कुटुंबियांना वेळ देत आहे आणि त्यामुळेच तो पहिल्या दोन कसोटीत खेळू शकला नाही. मी आत्ताच काही सांगू शकत नाही, परंतु त्याला पुन्हा मैदानावर खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तो आनंदी आहे. माझं त्याला भरभरून प्रेम. त्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हरणार आहे. त्यामुळे याक्षणी त्याचे अनुष्कासोबत राहणे महत्त्वाचे आहे.

पण, आता डिव्हिलियर्सने ती चूक असल्याचे मान्य केले. विराट कोहलीअनुष्का शर्मा हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार असल्याचे वृत्त खरं नसल्याचेही त्याने यावेळी सांगितले. तो आता म्हणाला, क्रिकेटच्या आधी कुटूंब... मी माझ्या यू ट्युब चॅनेलवर खूप मोठी चूक केली. ती माहिती चुकीची होती आणि त्यात तथ्य नव्हते. विराटसाठी नेहमीच कुटूंब हे प्राधान्य राहिले आहे. तिथे नेमकं काय घडत आहे, हे कुणालाच माहित नाही. मी त्याला आता फक्त शुभेच्छा देऊ शकतो. त्याच्या विश्रांती मागे काही कारण असलं तरी तो दमदार पुनरागमन करेल, अशी मला आशा आहे.  

टॅग्स :विराट कोहलीएबी डिव्हिलियर्सअनुष्का शर्मा