Join us  

भारताला इतिहास घडविण्याची संधी, १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडचे आव्हान

iCC Womens U-19 World Cup final : पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ आज, रविवारी बलाढ्य इंग्लंडविरुद्ध भिडेल. यावेळी इंग्लंडला नमवून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी भारतीय मुलींपुढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 6:17 AM

Open in App

पोत्चफस्ट्रम : येथे सुरू असलेल्या पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ आज, रविवारी बलाढ्य इंग्लंडविरुद्ध भिडेल. यावेळी इंग्लंडला नमवून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी भारतीय मुलींपुढे आहे. इंग्लंडने महिला क्रिकेटमधील प्रत्येक विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे भारतीय मुलींना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

इंग्लंडच्या महिलांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासह, पहिला टी-२० विश्वचषकही पटकावला होता. त्यामुळे आता मुलींचा विश्वचषकही जिंकून अनोखी हॅटट्रिक नोंदवण्याच्या निर्धाराने इंग्लंडचा संघ खेळेल. भारतीय मुलींनी शेफाली वर्माच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठली. वरिष्ठ स्तरावर आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलेल्या शेफालीला अद्याप या स्पर्धेत आपल्या लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात तिच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. उपांत्य लढतीत, टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत अंतिम फेरी गाठली आहे. 

दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आज, रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड असा फायनलचा सामना होणार आहे. भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची आणि देशासाठी यंदाच्या वर्षातील पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ड गटात समावेश असलेल्या भारतीयांनी दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र टीम इंडियाने दमदार पुनरागमन करीत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सामन्याची वेळ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.१५ वाजल्यापासून. 

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App