Join us  

IPL 2021: ‘गब्बर’ने पहिल्याच सामन्यातून टीम इंडियाच्या सिलेक्टर्सना दिला इशारा; नोंदवला नवा विक्रम!

IPL 2021, Shikhar Dhawan: आयपीएलच्या गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या सत्राची दिमाखात सुरुवात करताना बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा दणदणीत पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 1:04 PM

Open in App

मुंबई : आयपीएलच्या गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या सत्राची दिमाखात सुरुवात करताना बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा दणदणीत पराभव केला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामीवीरांनी तडाखेबंद अर्धशतक झळकावत दिल्लीचा शानदार विजय नोंदवला. मात्र, यावेळी चमकला तो गब्बर शिखर धवन. त्याने या सामन्यात दोन विक्रमांना गवसणी घालतानाच भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनाही आपली दखल घेण्यास भाग पाडले.सीएसकेने दिलेल्या १८९  धावांचा पाठलाग करताना दिल्लीने १८.४ षटकांतच केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ठरले ते पृथ्वी आणि धवन. पृथ्वीने सुरुवातीपासून हल्ला चढवताना ३८ चेंडूंत ७२ धावा चोपल्या. दुसरीकडे, धवनने ५४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८५ धावा चोपताना सीएसकेची धुलाई केली.

या सामन्याचा हिरो ठरला तो अनुभवी धवन. आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धवनला कामगिरीत सातत्य न राखता आल्याने काही काळासाठी त्याला भारतीय संघातून बाहेर बसावे लागले होते. त्यातच कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मासह भारताच्या डावाची सुरुवात केल्याने धवनच्या चिंतेत आणखी भर पडली होती.

मात्र आता धवनने आपल्या स्टाईलने दणकेबाज फटकेबाजी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्याने ३५ चेंडूंतच आपले अर्धशतक ठोकले. आयपीएलमधील हे धवनचे ४२वे अर्धशतक ठरले आणि सर्वाधिक अर्धशतक ठोकणाºया फलंदाजांमध्ये तो आता डेव्हिड वॉर्नरनंतर (४८) दुसऱ्या स्थानी आहे.

शिवाय धवनने या सामन्यात १० चौकार मारले आणि त्याने आयपीएलमध्ये एकूण ६०१ चौकार मारण्याचा पराक्रमही पूर्ण केला. दखल घेण्याची बाब म्हणजे आयपीएलमध्ये ६०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी धवनला केवळ ९ चौकार मारण्याची गरज होती, मात्र तो त्याने सहजपणे गाठत आपला दर्जा सिद्ध केला.  

टॅग्स :शिखर धवनआयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्स