Join us  

आजच्याच दिवशी टीम इंडियाने इतिहास घडवला अन् आयपीएलचा जन्म झाला

१३ वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय संघानं पहिल्यावहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 7:17 PM

Open in App

मुंबई : ज्या देशाचा टी-२० सामन्यांना विरोध होता, त्याच देशाने क्रिकेटविश्वाला एका रोमांचक व पैशांचा धो-धो पाऊस पाडणाºया Indian Premier League (IPL 2020) या लीगची भेट दिली आहे. मात्र या लीगच्या जन्माची गोष्टही रोमांचक आहे. भारतीय क्रिकेटमध्ये टी-२० प्रकार रुळेल का आणि यामुळे क्रिकेटचा पारंपरिक स्तर टिकेल का? अशी शंका अनेक माजी क्रिकेटपटूंसह बीसीसीआयला होती. आजच्याच दिवशी २००७ साली भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला फायनलमध्ये ५ धावांनी लोळवले होते आणि पहिला टी-२० विश्वचषक उंचावला होता.हाच ऐतिहासिक क्षण कारणीभूत ठरला तो इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवतीला. अर्थात आयपीएलच्याआधीही इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) सुरु झालेली. मात्र या लीगला बीसीसीआयने मान्यता दिली नव्हती आणि ही स्पर्धा जशी सुरु झाली तशी लगेच बंदही झाली. परंतु, २००७ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियाने थेत जेतेपद पटकावले आणि बीसीसीआयला विश्वास वाटू लागला आणि त्यानंतर जन्म झाला तो आयपीएलचा.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेनंतर २००५ साली पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना झाला. परंतु, क्रिकेटविश्वातील आर्थिक महासत्ता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) टी-२० क्रिकेटला विरोध होता. तोपर्यंत आयसीसीने २००७ साली पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा निर्णय घेतला. आयसीसीने कसेबसे बीसीसीआयचे मन वळविले. पण बीसीसीआयची नाराजी पूर्ण दूर झाली नव्हती. भारताने पहिल्या टी-२० विश्वचषकासाठी युवा खेळांडूचा संघ पाठविला आणि या संघाचा कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी.नवख्या भारतीय संघाकडे टी-२० सामन्यांचा म्हणावा तसा काहीच अनुभव नसल्याने भारतीय संघ कितपत मजल मारणार अशीच चर्चा होती. मात्र ‘कॅप्टन कूल’ धोनीने अत्यंत कल्पक नेतृत्त्व करताना भारताला थेट विश्वविजेतेपद मिळवून दिले. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवून विजेतेपद पटकावल्याने या विश्वविजेतपदाचा आनंद द्विगुणित झाला होता.यानंतर बीसीसीआयला स्वप्नं पडू लागली ती टी-२० लीगची. या विश्वविजेतेपदानंतर काहीच महिन्यांनी बीसीसीआयने आयपीएलची घोषणा केली आणि पुढच्याच वर्षी २००८ साली पहिल्या आयपीएलचे आयोजन झाले. क्रिकेटचाहत्यांनी या लीगला अक्षरश: डोक्यावर घेतले. वर्षभराच्या कमाईहून कितीतरी अधिक पटीने कमाई जेमतेम दोन महिने रंगणाºया आयपीएलच्या माध्यमातून होत असल्याने बीसीसीआयसाठी ही स्पर्धा सोन्याची कोंबडीच ठरली. आयसीसीसह सर्वच राष्ट्रीय संघटनांनाही आर्थिक फायदा झाल्याने आयपीएलची लोकप्रियता तसेच याला मिळणारा पाठिंबा वाढत राहिला.   

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानIPL 2020एम. एस. धोनी