ठळक मुद्देकोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून एकदिवसीय आणि टी-20 सोबत कसोटीमध्येही नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. सर्वात जलदगतीने पाच हजार धावा करण्याचा भारतीय विक्रम लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावे आहेत.
नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने करीयरमधील आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. लंचनंतर फलंदाजीला उतरलेल्या कोहलीने श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमलला चौकार ठोकून 5 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे. विराटचा हा 63 वा कसोटी सामना असून त्याने 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतक झळकवली आहेत.
कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून एकदिवसीय आणि टी-20 सोबत कसोटीमध्येही नवनवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. श्रीलंकेविरोधात दुस-या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून दुहेरी शतक ठोकत विराटने ब्रायन लाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्याचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्डही विराट कोहलीने मोडला आहे.
सर्वात जलदगतीने पाच हजार धावा करण्याचा भारतीय विक्रम लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावे आहेत. सुनील गावस्कर यांनी 52 सामन्यांमध्ये 95 डावात पाच हजार धावा केल्या होत्या. दुस-या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने 59 सामन्यांत 99 डावांमध्येच हा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने पाच हजार धावा पुर्ण करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावे आहेत. त्यांनी फक्त 36 सामन्यांतील 56 डावांत हा पाच हजार धावांचा टप्पा पुर्ण केला होता.
भारताने दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ करण्याची नामुष्की ओढवली होती.