MS Dhoni set to retire? Rumours of former skipper calling for press conference today go viral | कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार ?

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार ?

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं निवृत्त व्हावं, अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी आज निवृत्तीची घोषणा करतो की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कर्णधार विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. 

कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहे. कोहलीनं नेमका कोणता फोटो शेअर केला. भारतात 2016मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 4 फलंदाज 94 धावांत माघारी परतले होते. त्यांना 36 चेंडूंत विजयासाठी 65 धावांची गरज होती. त्यावेळी कोहली आणि तत्कालीन कर्णधार धोनी खेळपट्टीवर होते. त्या सामन्यात कोहलीनं 51 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 82 धावा केल्या, तर धोनी 10 चेंडूंत 3 चौकारांसह 18 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात धोनीनं कोहलीला एकेका धावेसाठी अक्षरशः पळवलं होतं. धोनीच्या चपळतेनं कोहलीला चांगलेच दमवले होते. त्यामुळेच सामन्यानंतर कोहलीनं खेळपट्टीवर गुडघे टेकले.

याच सामन्यातील त्या अखेरच्या क्षणाचा फोटो कोहलीनं इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.'' कोहलीच्या या ट्विटनंतर धोनीच्या निवृत्तीचा चर्चांना वेग आला.

 

Web Title: MS Dhoni set to retire? Rumours of former skipper calling for press conference today go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.