भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने बुधवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सेवा आणि व्यवस्थापनावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गुवाहाटीहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाला झालेल्या प्रचंड विलंबामुळे आणि प्रवाशांना कोणतीही माहिती न दिल्यामुळे सिराजने आपला संताप व्यक्त केला आणि लोकांना या एअरलाइनने प्रवास न करण्याचा सल्ला दिला.
सिराज गुवाहाटीहून हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट क्रमांक IX २८८४ मधून प्रवास करणार होता. या विमानाचे नियोजित उड्डाण रात्री ७:२५ वाजताचे होते. या विमानाला चार तास उशीर होऊनही एअरलाइन कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती, ज्यामुळे विमानतळावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला, असे सिराजने म्हटले आहे.
"गुवाहाटीहून हैदराबादला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक IX २८८४ रात्री ७:२५ वाजता निघणार होती. परंतु, विमानाला चार तास उशीर झाला. मात्र, याबाबत आम्हाला एअरलाइनकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच वारंवार फोन करूनही आम्हाला अद्याप कोणतेही अपडेट मिळालेले नाहीत, ज्यामुळे आम्ही अडकून पडलो आहोत. हा सर्वात वाईट अनुभव आहे. मी कोणालाही या विमानातून प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही.
एअरलाइन्सने मागितली माफी
"आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत. अचानक ऑपरेशनल कारणांमुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आले, याबद्दल आम्हाला खेद आहे. विमानतळावरील आमची टीम सर्व प्रवाशांना आवश्यक व्यवस्था करण्यात मदत करत आहे. आम्ही तुमच्या संयमाची आणि समजुतीची खरोखर प्रशंसा करतो. आमची टीम तुम्हाला अपडेट देत राहील आणि शक्य ते सर्व मदत करेल."