Laxman Shivaramakrishnan to be elected selection committee chairman | लक्ष्मण शिवरामाकृष्णन होऊ शकतात निवड समिती अध्यक्ष
लक्ष्मण शिवरामाकृष्णन होऊ शकतात निवड समिती अध्यक्ष

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच सध्या त्यांना पर्याय म्हणून अन्य व्यक्तीचा शोध सुरु असून पुढील महिन्यात एक तारखेला होणाºया वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये निवड समितीचा नवा अध्यक्ष ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळाली.


राष्ट्रीय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रसाद यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळेच सध्या त्यांच्या जागी शिवरामाकृष्णन यांचे नाव आघाडीवर येत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूकडून त्यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बीसीसीआयच्या बैठकीमध्ये निवड समितीच्या निर्णयावर मुख्य चर्चा होईल. याशिवाय क्रिकेट सल्लागार समितीविषयीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.

Image result for laxman sivaramakrishnan

प्रसाद यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण निवड समितीच नव्याने स्थापन करण्यात येण्याचा विचार बीसीसीआयचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सध्या अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या ज्युनिअर निवडकर्त्याची जबाबदारी पार पडत असलेले ज्ञानेंद्र पांड्ये हेदेखील शिवरामाकृष्णन यांच्यासह निवड समितीत येऊ शकतात. तसेच, जतिन परांजपे, देवांग गांधी आणि सरनदीप यांचीही निवड समितीत निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने निवड समितीसाठी अनेक व्यक्तींशी संपर्क साधला. परंतु बहुतेकांनी यासाठी नकार दिला. यामुळेच बीसीसीआय आपल्या वार्षिक बैठकीत निवडकर्त्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णयही घेऊ शकते. यामुळे राष्ट्रीय निवड समितीमध्ये येण्यासाठी प्रतिसाद मिळेल, अशी बीसीसीआयला आशा आहे.

Web Title: Laxman Shivaramakrishnan to be elected selection committee chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.