गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान काल (गुरुवार, १२ जून) अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेनंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी भावनिक पोस्ट शेअर केली. जीवन खूप मौल्यवान आहे, त्यामुळे आपल्या प्रियजनांवर प्रेम करा, असे त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर पीटरसनने एक्स हँडलवरून एक भावनिक पोस्ट केली."भारतात काल झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल मी जितके जास्त वाचतो, तितकेच मला वाइट वाटते आणि सर्व प्रवाशांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी खूप दुःख होते. जीवन खूप मौल्यवान आहे. तुमच्या प्रियजनांवर प्रेम करा!"
अहमदाबादमध्ये काल दुपारी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरून सोडले. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान एका निवासी भागात कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेत स्थानिक लोकांचाही मृत्यू झाला. आतापर्यंत २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे.
अपघातानंतर सुमारे एक तासानंतर एसडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचू शकली. त्याआधी स्थानिक रहिवाशांनी काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीची तीव्रता पाहता कोणीही वाचू शकले नाही. "इंधन टाकीच्या स्फोटामुळे इतकी मोठी आग लागली की, काही सेकंदातच सर्व काही जळून खाक झाले", अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पीपीई किट घालून एसडीआरएफचे जवान मृतदेह शोधण्यासाठी ढिगाऱ्याजवळ पोहोचले. परंतु, तापमान जास्त असल्याने घटनास्थळी काम करणे कठीण झाले.
Web Title: Kevin Pietersen Shares Emotional Post After Ahmedabad Plane Crash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.