Kabaddi Tournament: Worli Sports club, Vihang mandal enter third round | कबड्डी स्पर्धा : वरळी स्पोर्ट्स, विहंग मंडळ तिसऱ्या फेरीत दाखल
फोटो प्रातिनिधीक आहे

मुंबई : श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, वरळी स्पोर्ट्स क्लब, मातृभूमी क्रीडा मंडळ, श्रीराम क्रीडा मंडळ, विहंग क्रीडा मंडळ, शिवाजी स्पोर्ट्स क्लब यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरूष व्दितीय श्रेणी गटाची तिसरी फेरी गाठली.

नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणात सुरू असलेल्या सामन्यात श्री स्वामी समर्थने अटीतटीच्या लढतीत मध्यांतरातील १३-१७ अशी पिछाडी भरून काढत जय बजरंगवर ३८-२७अशी बाजी उलटविली. विद्यासागर कोकितकर, प्रतिक जाधव यांनी जय बजरंगला विश्रांतीपर्यंत ४ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. पण विश्रांती नंतर स्वामी समर्थच्या अतुल पाटील, भिलवाई सावंत यांनी आपल्या खेळत आक्रमकता आणत संघाला तिसरी फेरी गाठून दिली.


वरळी स्पोर्ट्सने मध्यांतरातील १गुणाच्या पिछाडीवरून सिद्धिविनायक क्रीडा मंडळाला ३८-३७ असे चकवीत आपली विजयी धोडदौड चालू ठेवली. आर्यन पांचाळ, साहिल तांडेल वरळी स्पोर्टसकडून, तर सतीश जाधव, अंकुश पवार सिद्धिविनायककडून उत्तम खेळले.मातृभूमी क्रीडा मंडळाने देखील १३-२१ अशी पहिल्या डावातील पिछाडी भरून काढत अमर प्रतिष्ठानचा कडवा प्रतिकार ३८-३२ असा मोडून काढला. विशाल चव्हाण यांच्या धारदार चढाया व सुरज घाडगेचा भक्कम पकडीचा जोरावर अमरला पहिल्या डावात ८गुणांची आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते. पण दुसऱ्या डावात ते सातत्य त्यांना राखता आले नाही.मातृभूमीच्या राकेश तोडणकर, नारायण तोडणकर यांनी आपल्या आक्रमणाची धार वाढवीत संघाला ६गुणांनी तिसरी फेरी गाठून दिली.

श्रीराम क्रीडा मंडळाने ५-५ चढायांच्या डावात ओम ज्ञानदीप मंडळाला ३२-३० असे चकवीत पुढची फेरी गाठली. विश्रांतीला १५-१२ अशी ओम ज्ञानदीपकडे आघाडी होती. पूर्ण डावात दोन्ही संघाची २६-२६ अशी बरोबरी झाली. शेवटी श्रीरामाने ६-४ अशी ५-५चढायांच्या डावात बाजी मारली. विनायक म्हात्रे, राजेश खोत श्रीरामकडून, तर अनिकेत कदम, निकील आंबोलकर ओम ज्ञानदीपकडून उत्कृष्ट खेळले.
विहंग क्रीडा मंडळाने मध्यांतरातील २२-१२ अशा मोठ्या पिछाडीवरून श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळालाचा कडवा प्रतिकार ३४-३३असा संपुष्टात आणला. कल्पेश धुमाळ, अंकुश पाटील यांचे धारदार आक्रमण त्याला चेतन भोईरची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. श्रीराम विश्वस्तच्या गणेश महाजन, तुषार शिंदे यांचा झंजावाती खेळ संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला. शिवाजी स्पोर्ट्स क्लबने जयदत्त मंडळाचे आव्हान ३९-३४ असे मोडून काढले. यश पवार, देवेन पंदुरकर यांच्या झंजावाती खेळाने जयदत्तने विश्रांतीला ७गुणांची आघाडी घेतली होती. पण ती राखण्यात त्यांना अपयश आले. उत्तरार्धात लोझर, डुराल पाल यांनी टॉप गियर टाकत आपल्या खेळ गतिमान करीत संघला विजय पथावर नेले.


इतर संक्षिप्त निकाल (व्दितीय श्रेणी झ्र दुसरी फेरी)

१)गोलफादेवी क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध एकवीरामाता क्रीडा मंडळ (४३-३७); २)आकांक्षा क्रीडा मंडळ वि वि दुर्गामाता सेवा मंडळ (३८-३०); ३)काळेवाडीचा विघ्नहर्ता वि वि विजय नवनाथ (३४-१८); ४)गावदेवी क्रीडा मंडळ वि वि भावकोमाता क्रीडा मंडळ (३४-३१); ५)ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट वि वि बारादेवी क्रीडा मंडळ (२५-२४); ६)प्रॉमिस स्पोर्ट्स क्लब वि वि इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब (३१-२३).

Web Title: Kabaddi Tournament: Worli Sports club, Vihang mandal enter third round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.