IPL postponed, Dhoni still gets a chance - Banerjee | आयपीएल स्थगित, तरीही धोनीला मिळेल संधी - बॅनर्जी

आयपीएल स्थगित, तरीही धोनीला मिळेल संधी - बॅनर्जी

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्टÑीय क्रिकेटमधील पुनरागमन दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालले आहे. मात्र त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांना अजूनही आशा आहेत. धोनी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताकडून नक्की खेळेल असे त्यांना वाटते.
इंडियन प्रीमियर लीग २९ मार्चपासून सुरू होणार होते. मात्र कोविड १९ च्या प्रसारामुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आयपीएल रद्दच होण्याची जास्त शक्यता आहे.
धोनी जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक र्स्प्धेतील उपांत्य सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. बॅनर्जी म्हणाले,‘ सध्यस्थितीत आयपीएल होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे. धोनीची स्थिती कठीण असली तरी माझ्या सिक्स सेन्सनुसार धोनीला या विश्वचषक स्पर्धेत नक्कीच खेळण्याची संधी मिळेल. हा त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक असेल. मी त्याच्या सातत्याने संपर्कात असून तो चेन्नईत परतल्यानंतर मी त्याच्याशी संवाद साधला होता. तो सध्या तंदुरुस्तीवर भर देत असून तो सध्या पूर्ण तंदुरुस्त आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी यापूर्वीच सांगितले आहे की,‘ आयपीएलमध्येच धोनीच्या भवितव्याबाबत चित्र स्पष्ट होईल. मात्र आयपीएल रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर व विरेंद्र सेहवाग या दिग्गज क्रिकेटपटूंनी धोनीच्या भविष्याबाबत शंका उपस्थित केली आहे.
बॅनर्जी म्हणाल,‘ मागील वर्षाच्या जुलैपासून धोनीने कोणताही सामना खेळलेला नाही हे खरे आहे. मात्र त्याच्याकडष ५३८ आंतरराष्टÑीय सामन्यांचा अनुभव आहे. त्याला सामन्यावेळी समायोजन करताना कोणतीही अडचण येणार नाही.’ ते म्हणाले,‘ रांचीमध्ये सर्व काही बंद आहे. मात्र तो आपल्या घरी तंदुरुस्तीचा व्यायाम करत आहे. त्याच्याकडे घरातच व्यायामशाळा, बॅडमिंटन कोर्ट, व धावण्याचीही सोय आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: IPL postponed, Dhoni still gets a chance - Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.