आयपीएलचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित, दोन हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:16 AM2021-05-05T02:16:12+5:302021-05-05T02:16:32+5:30

कोरोनापुढे बायोबबल ‘फेल’: साहा, मिश्रा पॉझिटिव्ह आढळताच बीसीसीआयला घ्यावा लागला निर्णय

IPL matches postponed indefinitely, hitting Rs 2,000 crore | आयपीएलचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित, दोन हजार कोटींचा फटका

आयपीएलचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित, दोन हजार कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देबायो-बबलमध्येही कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लीगमधील खेळाडूंच्या सुरक्षित परतण्याची जबाबदारी आमची असून त्यासाठी सर्वाेत्कृष्ट प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

नवी दिल्ली : बायोबबल भेदून अनेक खेळाडू आणि स्टाफला कोरोनाने विळखा घातल्याचे लक्षात येताच मागील महिनाभरापासून सुरू असलेले इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) पुढील सामने मंगळवारी तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला अखेर घ्यावा लागला.
सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा हे पॉझिटिव्ह आढळताच ही घोषणा करण्यात आली. त्याआधी सोमवारी चेन्नई सुपरकिंग्जचे गोलंदाजी कोच लक्ष्मीपती बालाजी आणि केकेआरचे गोलंदाज वरुण चक्रवर्थी तसेच संदीप वॉरियर हेदेखील पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे खेळाडू तसेच स्टाफच्या आरोग्याची काळजी सर्वतोपरी असल्याचे कारण सांगून सोमवारचा तसेच मंगळवारचा सामना रद्द करण्यात आला होता. पाठोपाठ आयपीएल संचालन परिषद आणि बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीत लीगचे पुढील सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला.

बायो-बबलमध्येही कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लीगमधील खेळाडूंच्या सुरक्षित परतण्याची जबाबदारी आमची असून त्यासाठी सर्वाेत्कृष्ट प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडसह अन्य देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएल ९ एप्रिलला सुरू झाले. तेव्हापासून केकेआरचे खेळाडू पॉझिटिव्ह येईपर्यंत २९ सामने यशस्वीरीत्या खेळविण्यात आले. गुणतालिकेत दिल्ली संघ अव्वल स्थानी आहे. चेन्नई दुसऱ्या, आरसीबी तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबाद संघ आठव्या स्थानावर आहे. यादरम्यान काही दिवसांआधी कोविड-१९च्या चिंतेमुळे ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी माघार घेतली होती. मागच्यावर्षी कोरोनाच्या सावटात आयपीएल सामने यूएईत खेळविण्यात आले होते. त्यावेळी स्पर्धा सुरू होण्याआधी काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले, मात्र नंतर सर्व सामन्यांचे आयोजन सुरळीत झाले. यंदा भारतात कोरोनाबाधितांची संख्या लाखोंच्या संख्येने वाढतच आहे.

दोन हजार कोटींचा फटका

लीग स्थगित झाल्याने बीसीसीआयचे दोन हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक सामनेदेखील रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्थगित झाल्यामुळेच विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह लागले. गतवर्षी आयपीएल आयोजन यूएईत झाल्यामुळे आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ३.६ टक्क्यांनी घसरली होती. आयपीएलमुळे बीसीसीआयच्या महसुलात मोठी वाढ होते. सरकारलासुद्धा योग्य कर मिळतो. बीसीसीआयने २००७-०८ पासून सरकारला ३५०० कोटी रुपये कर रूपाने दिले आहेत. बीसीसीआयने लीगमधून ४० टक्के कमाई केली आहे.
 

स्थगितीमागील कारणे...

n आयपीएलचे ३१ सामने शिल्लक होते. मात्र कोरोना संकटामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. टी-२० विश्वचषकानंतर उर्वरित सामने खेळले जातील,’ असे सांगितले जात आहे.
n स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रथमच केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे केकेआर-आरसीबी सामना रद्द करण्यात आला.
n केकेआरविरुद्ध विजय मिळविणाऱ्या 
दिल्लीच्या संपूर्ण संघाला विलगीकरणात पाठविण्यात आले.
 

n सीएसकेचे गोलंदाजी कोच लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह तिघांना कोरोनाची लागण झाली. बालाजी हे दिल्लीच्या खेळाडूंच्या काहीवेळ संपर्कात असल्याने प्रश्न उपस्थित झाला होता.
n मंगळवारी दिल्लीत सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार होता. मात्र सामन्यापूर्वी हैदराबादचा रिद्धिमान साहा आणि दिल्लीचा अमित मिश्रा यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच हा सामनादेखील रद्द झाला.
 

n परदेशी खेळाडूंनी आयपीएल आयोजनावर प्रश्न उपस्थित करत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ही स्पर्धा मध्येच सोडली. रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यानेदेखील माघार 
घेतली.
n स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात करीत यशस्वी पुनरागमन केले.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL matches postponed indefinitely, hitting Rs 2,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app