भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२५ आयपीएलच्या सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२५ मधील उर्वरित १७ सामने एकूण सहा ठिकाणी खेळवले जाणार आहेत. दरम्यान, ३ जून २०२५ रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. सरकार, सुरक्षा संस्था आणि इतर प्रमुख भागधारकांशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, आपीएल १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होईल. उर्वरित सर्व सामने सहा मैदानांवर खेळवले जातील. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पुन्हा खेळवण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ २४ मे रोजी जयपूरमध्ये आमनेसामने येतील.
आयपीएल २०२५ मधील उर्वरित सामने बंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील. नवीन वेळापत्रकात रविवारी खेळवल्या जाणाऱ्या दोन डबलहेडर सामन्यांचाही समावेश आहे. पहिला डबल हेडर सामना १८ मे रोजी आहे. रविवारी दुपारी राजस्थान रॉयल्सचा सामना जयपूरमध्ये पंजाब किंग्जशी होईल. तर त्याच दिवशी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सचा सामना दिल्लीमध्ये गुजरात टायटन्सशी होईल. त्यानंतर दुसरा डबल हेडर २५ मे रोजी होईल. रविवारी, गुजरात टायटन्स दुपारी चेन्नई सुपर किंग्जशी आणि सनरायझर्स हैदराबाद संध्याकाळी ७:३० वाजता कोलकाता नाईट रायडर्सशी लढेल.
२८ मे, ३१ मे आणि २ जून रोजी कोणतेही सामने खेळवले जाणार नाहीत. प्लेऑफ २९ मे पासून सुरू होतील. पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी होईल. एलिमिनेटर सामना ३० मे रोजी खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी खेळला जाईल. तर, या स्पर्धेतील अंतिम सामना ३ जून रोजी होईल.
Web Title: IPL 2025 To Resume From May 17, Revised Schedule Announced; Check Qualifiers and Final Dates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.