आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली. विराटने अवघ्या ११ डावांत ६३.१३ च्या सरासरीने एकूण ५०५ धावा केल्या आहेत. त्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आयपीएलमध्ये आज आरसीबीचा सामना हैदराबादशी होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडे विश्वविक्रम रचण्याची संधी असेल.
कोहलीने आरसीबीसाठी आतापर्यंत एकूण २७८ टी-२० सामने खेळले आहेत आणि ३९.५२ च्या सरासरीने ८९३३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ८ शतके आणि ६४ अर्धशतकेही झळकावली आहेत. कोहलीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आणखी ६७ धावा केल्या तर तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघासाठी ९००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनेल. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहली वेगळ्याच अंदाजात दिसला. तो आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आयपीएल २०२५ मध्ये विराटने एकूण ७ अर्धशतके झळकावली आहेत. हैदराबादविरुद्ध विराटची आकडेवारी चांगली आहे. त्याने हैदराबादविरुद्धच्या २३ सामन्यांत ३६.२९ च्या सरासरीने ७६२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कशी कामगिरी बजावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Web Title: IPL 2025: RCB Batsmen virat kohli 63 runs away to create history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.