यंदाच्या आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या लढतीमध्ये बंगळुरूने दणदणीत विजय मिळवत आरामात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर आता सामन्यावेळी स्टेडियममध्ये एक बॅनर घेऊन आलेल्या महिलेचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. जर आरसीबीने अंतिम सामन्यात विजय मिळवला नाही, तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन, असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला होता. त्यामुळे बघता बघता हा बॅनर खूपच व्हायरल झाला आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ तब्बल ९ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे संघाच्या चाहत्यांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे या महिलेने संघाच्या कामगिरीवर विश्वास ठेवत झळकवलेला बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच या महिलेने काय विचार करून एवढा मोठा धोका पत्करला आहे, असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.
गुरुवारीचंडीगड येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान, लाल साडी परिधान केलेली एक महिला क्रिकेटप्रेमी आकर्षणाचा केंद्र बनली होती. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर धडाधड व्हायरल होत आहेत. या महिलेना आपल्या हातात एक बॅनर घेतला होता. त्यावर आरसीबी जर फायनल जिंकली नाही, तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन, असं लिहिलेलं होतं.
दरम्यान, या पोस्टवर आता क्रिकेटप्रेमींकडून गमतीदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यात एका युझरने लिहिले आहे की, ‘’घटस्फोट द्यावा लागणार नाही. हिचा पती आनंदी आहे की दु:खी हे कळायला मार्ग नाही’’. तर दुसऱ्याने सांगितले की, ‘’आता सांगा यामध्ये पतीची काय चूक आहे?’’ तर आणखी एकाने फारच गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘’विराट कोहली बघून ठेव. जर यावेळी हरताल तर तुझ्यामुळे एक जोडपं वेगळं होईल’’.
Web Title: IPL 2025, PBKS Vs RCB: "If RCB doesn't win the final, I will divorce my husband," photo of woman carrying poster during match goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.