मतीन खान
स्पोर्टस हेड- एव्हीपी लोकमत पत्रसमूह
इंडियन प्रीमियर लीग म्हणजे स्वदेशी क्रिकेट लीग. मागच्या १८ सत्रांमध्ये भारतीय चाहत्यांनी या लीगला अक्षरशः डोक्यावर घेतले. क्रीडाक्षेत्रातील सर्वांत मोठी लीग बनण्याकडे आयपीएलची वाटचाल सुरू आहे. यासह भारताची वाढती आर्थिक ताकद, सांस्कृतिक प्रभाव आणि वैश्विक क्रीडा शक्तीचे सर्वात प्रभावी प्रतीक बनली आहे.
'आर्थिक इकोसिस्टीम' बाहेर जाणार
१६ डिसेंबर रोजी आयपीएल मिनी लिलाव ऐतिहाद एरिनामध्ये होईल. मग प्रश्न असा की, लीग भारतीय आहे, भारतातील फ्रेंचाइजी पैसा ओतत आहेत, तरीही विदेशात लिलाव का ? भारतीय क्रिकेट चाहत्यांची ही फसवणूक नाही का? लिलावाचे आयोजन साता समुद्रापार असेल, पण आर्थिक स्तर भारताकडेच असणार आहे, पण सत्य हेच आहे की 'आर्थिक इकोसिस्टीम'चा वाटादेखील विदेशात जाणार.
विदेशात लिलाव, भारताचे नुकसान कसे?
पर्यटन क्षेत्राचे नुकसान : संघ मालक,व्यवस्थापन, आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तिकीट बुकिंग, फाईव्ह स्टार हॉटेल्स बुकिंग, एअरपोर्ट ट्रान्सफर, कॅब, स्थानिक प्रवास, रेस्टॉरंट, क्लब, बैठका, आणि मनोरंजनावर होणारा खर्च, इव्हेंट मॅनेजमेंट, आणि प्रॉडक्शन इंडस्ट्रीजचे मोठे नुकसान होणार आहे. आयपीएल लिलावामागे फार मोठे सेटअप असते.
मीडिया- प्रक्षेपणाशी निगडित खर्च
सॅटेलाइट अपलिंक टीम, ऑन-ग्राउंड प्रॉडक्शन क्रू, मीडिया इंटरव्ह्यू आणि डिजिटल शूट, स्टुडियो संचालन या सर्व
बाबी लिलावादरम्यान अबुधाबी येथे नफा कमवून देणाऱ्या ठरतील.
बँड प्रमोशन - मार्केटिंगमध्ये घसरण
लिलाव भारतात झाल्यास प्रायोजक हे प्रमोशनल झोन, डिस्प्ले अॅक्टिव्हिटी, मीडिया सेलिब्रेशन, मोहीम लाँचिंग या गोष्टी भारतात होऊ शकतात.
भारतीय शहरांना लाभ नाही
मुंबई,बंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर या शहरांना क्रिकेटच्या आयोजनातून नफा आणि इतर फायदा होतो. त्यात हॉटेल, टॅक्सी सेवा, कॅटरिंग, लोकल इव्हेंट स्टाफ, माध्यमांचा समावेश आहे.विदेशात आयोजन झाल्यास ही लघु अर्थव्यवस्था भारतीयांच्या हातातून निघून यूएईकडे जाणार आहे.
प्रतीकात्मक नुकसान
हे नुकसान आर्थिक नुकसानीपेक्षा प्रतिष्ठा आणि प्रभावाशी निगडित आहे. आयपीएल भारताचा सर्वांत मोठा जागतिक बँड आहे. याचा मिनी लिलाव भारताबाहेर होणे, हे क्रिकेटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या भारताची आर्थिक स्थिती कमकुवत करणारे ठरेल. यूएईतील क्रीडा सुविधा आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीला बळ लाभेल.