Join us  

कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:00 PM

Open in App

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. KKR ने हा विजय मिळवून १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. शिवाय त्यांनी नेट रन रेटही ( ०.९७२ ते १.०९६ असा) प्रचंड सुधारून अन्य संघांवर दडपण निर्माण केले आहे. DC ला मात्र ११ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागल्याने प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित ३ सामन्यांत विजय मळवणे गरजेचे झाले आहे. 

नाणेफेक जिंकून DC ने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि KKR च्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. पृथ्वी शॉ ( १३), जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( १२), अभिषेक पोरेल ( १८), शे होप ( ५) यांना वैभव अरोरा ( २ विकेट्स), मिचेल स्टार्क व हर्षित राणा यांनी माघारी पाठवले. रिषभ व अक्षर पटेल ( १५) यांच्यावर भीस्त होती, परंतु वेंकटेश अय्यरने फिरकीवर DC ला अडकवले. त्याने चार षटकांत १६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. रिषभ २७ धावांवर माघारी परतला. सुनील नरीन यानेही ४ षटकांत २४ धावांत १ विकेट मिळवली. असे असताना कुलदीप यादव मैदानावर उभा राहिला आणि नाबाद ३५ धावा करून दिल्लीला ९ बाद १५३ धावांपर्यंत पोहोचवले. हर्षित राणानेही दोन विकेट्स घेतल्या. 

दिल्लीच्या फलंदाजांची जशी अवस्था झाली होती, त्याउलट कोलकाताच्या सलामीच्या जोडीने जोरदार फटकेबाजी करून दाखवली. फिल सॉल्ट आक्रमक पवित्र्यात होता, तर सुनील नरीनने सावध खेळ करून त्याला उत्तम साथ दिली. सॉल्टने २६ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. KKR ने ७९ धावांवर पहिली विकेट गमावली. नरीने १५ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रिंकू सिंगला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवून KKR ने चांगला डाव खेळला. अक्षरने गोळीच्या वेगाने चेंडू टाकून सॉल्टचा त्रिफळा उडवला. सॉल्ट ३३ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांसह आपलं काम करून गेला. रिंकूला ११ धावांवर माघारी जावं लागलं.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी KKR ला ट्रॅकवर ठेवले. अय्यरने आज आयपीएलमध्ये ३००० धावांचा  ( १०९ इनिंग्ज) टप्पा ओलांडला. सर्वात कमी इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांमध्ये अय्यर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा व शिखर धवनसह संयुक्त राहिला. गौतम गंभीर व विराट कोहली ( ११० इनिंग्ज) यांना त्याने मागे टाकले. श्रेयस व वेंकटेश यांनी ४० चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. KKR ने १६.३ षटकांत ३ बाद १५७ धावा करून विजय पक्का केला. वेंकटेश २६, तर श्रेयस ३१ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स